औरंगाबाद : उपमुख्यमंत्री अजित पवारांना स्वागतासाठी प्लास्टिक लावलेला पुष्पगुच्छ देणं औरंगाबादच्या उपायुक्तांना चांगलंच महागात पडलं आहे. पुष्पगुच्छला प्लास्टिक लावल्यामुळे महापालिका आयुक्त आस्तिककुमार पांडे यांनी अजित पवारांसमोरच उपायुक्तांवर दंडात्मक कारवाई केली. जागच्या जागी त्यांना पाच हजार रुपयांच्या दंडाची पावती देऊन दंड वसूल करण्यात आला. यापूर्वीही आयुक्त पांडे यांनी त्यांना शुभेच्छा देण्यासाठी येणाऱ्या नगरसेवकांनाही प्लास्टिक पुष्पगुच्छ वापरल्यामुळे दंड लावला होता.
दुसरीकडे, मराठवाड्याच्या दौऱ्यावर असलेले उपमुख्यमंत्री अजित पवार सरकारी अधिकाऱ्यांवर नाराज झाल्याची बाब समोर आली आहे. अजित पवार सरकारी अधिकाऱ्यांसोबत एक बैठक घेणार होते. या बैठकीसाठी सकाळी दहा वाजताची वेळ निश्चित करण्यात आली होती. मात्र, अनेक अधिकारी या बैठकीला आलेच नाहीत. तर काहीजण वेळेनंतर या बैठकीसाठी हजर झाले. त्यामुळे अजित पवार सरकारी अधिकाऱ्यांवर नाराज झाल्याचे समजते.
दरम्यान, औरंगाबादच्या विभागीय आयुक्त कार्यालयात उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आढावा बैठक घेतली. यात मराठवाड्यातील सगळ्याच जिल्ह्यांच्या बैठका होणार आहेत. आज पहिलीच बैठक ही औरंगाबाद जिल्ह्याची झाली. जिल्ह्यासाठी ३१० कोटींची नियोजन तरतूद मंजूर केल्याची माहिती औरंगाबादचे पालकमंत्री सुभाष देसाई यांनी दिली.
जिल्ह्यातील शाळांसाठी विशेष तरतूद करण्यात आली आहे. वर्गखोल्या बांधकाम आणि दुरुस्तीला निधी देण्यात आला आहे. तसंच औरंगाबादच्या घाटी रुग्णालयासाठी सुद्धा विशेष निधी देण्यात आल्याची माहिती देसाईंनी दिली. औरंगाबादच्या कचरा प्लांटसाठीसुद्धा विशेष निधी देण्यात येणार असल्याचं सुभाष देसाईंनी सांगितलं.