चंद्रशेखर भुयार, झी मीडिया, बदलापूर : प्रियकराने लग्नाला नकार दिल्यानं एका तरुणीने एक्सप्रेस खाली उड़ी मारून आत्महत्या केल्याची घटना बदलापूरमध्ये घडली आहे. याप्रकरणी बदलापूर ग्रामीण पोलिसांनी कासगाव इथं राहणाऱ्या प्रियकराला बेड्या ठोकल्या आहेत.
कल्याणला राहणाऱ्या मेघा मोरे या 24 वर्षीय तरुणीची बदलापूरच्या कासगावमध्ये राहणाऱ्या करण लहाने या तरुणाशी इंस्टाग्रामवर ओळख झाली होती. यानंतर गेल्या 5 वर्षांपासून या दोघांमध्ये प्रेमसंबंध होते. मात्र तरुणीने त्याच्याकडे लग्नाची मागणी केल्यानंतर त्याने टाळाटाळ करत लग्नाला नकार दिला.
यानंतर तरुणीच्या कुटुंबीयांनीही करणच्या घरी जाऊन विनवणी केली. मात्र त्यांनाही करणच्या कुटुंबीयांनी हाकलून दिल्याचा आरोप मृत तरुणीच्या कुटुंबीयांनी केलाय. या प्रकारानंतर तरुणीने करण यांच्याविरोधात बदलापूर ग्रामीण पोलीस ठाण्यात तक्रार केली, मात्र त्याची पोलिसांनी दखल घेतली नाही.
या तक्रारीची करणला माहिती मिळताच करणच्या मित्रांनी या तरुणीला फोन करत करण आत्महत्या करत असून तू लवकर ये, असं सांगितलं. त्यामुळे रविवारी दुपारी ही तरुणी करणला भेटण्यासाठी म्हणून बदलापूरला गेली. मात्र ती घरी परत आलीच नाही. सोमवारी पहाटे बदलापूरजवळ रेल्वे रुळावर तिचा मृतदेह आढळून आला.
करणने या तरुणीला आत्महत्या करण्यास प्रवृत्त केल्याची तक्रार तरुणीच्या कुटुंबीयांनी केली. त्यानुसार पोलिसांनी करण लहाने याच्याविरोधात गुन्हा दाखल करत त्याला बेड्या ठोकल्या आहेत. त्याला आज न्यायालयात हजर करण्यात आलं असता 20 जूनपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली असून या प्रकरणाचा पोलिस अधिक तपास करीत आहेत .