Genealogy of Thackeray : प्रखर लेखणी, धारदार कुंचला, टोकदार बाण, झुंजार नेते आणि परखड वक्ते असा उच्चार केला तर एकच चेहरा डोळ्यासमोर उभा राहतो, तो म्हणते हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांचा... मात्र, त्यांची ओळख नेहमी राजकारणातील भगवं वादळ अशी सांगितली तर वावगं ठरणार नाही. बाळासाहेबांचा राजकीय प्रवास झंझावाती राहिला. आज (23 जानेवारी) बाळासाहेब ठाकरे यांची 98 वी जयंती साजरी केली जात (Balasaheb Thackeray 98 th Birth Anniversary) आहे. अशातच महाराष्ट्राच्या राजकारणात आपलं भक्कम स्थान निर्माण करणाऱ्या ठाकरे कुटूंबाची वंशवेल कशी आहे? पाहुया...
ठाकरे नव्हे धोडपकर
ठाकरे कुटूंबाचं मुळ आडनाव धोडपकर होतं. प्रबोधनकार ठाकरे यांचे पणजोबा कृष्ण माधव धोडपकर हे रायगडमध्ये वास्तव्यास होते. मात्र, त्यांच्या पुत्रांनी म्हणजेच रामचंद्र धोडपकर यांनी आडनाव बदलून पनवेलकर केलं. रामचंद्र धोडपकर हे पनवेलमध्ये स्थाईक झाल्याने त्यांनी आडनाव बदललं. प्रबोधनकारांना (केशव सिताराम ठाकरे) वाचनाची आवड होती. ब्रिटीश लेखक विल्यम मेकपीस थॅकरे यांचा प्रभाव प्रबोधनकारांवर पडला. त्यामुळे त्यांनी आपलं आडनाव पनवेलकर न ठेवता ठाकरे केलं.
प्रबोधनकार ठाकरे
प्रबोधनकार ठाकरे आणि रमाबाई यांना एकूण आठ अपत्ये... त्यात 3 मुलगे आणि 5 मुली... बाळासाहेब ठाकरे, श्रीकांत ठाकरे आणि रमेश ठाकरे अशी त्यांच्या मुलांची नावं. बाळासाहेब ठाकरे 21 वर्षांचे असताना त्यांनी सरला वैद्य यांच्याशी लग्न केलं. त्यानंतर सरला सासरी येऊन मिनाताई झाल्या. रमेश ठाकरे यांनी लग्न केलं नाही. तर श्रीकांत ठाकरे यांचे चिरंजीव राज ठाकरे सध्या राजकारणात आहेत.
बाळासाहेब ठाकरे आणि मिनाताईंना तीन मुलं... सगळ्यात थोरले बिंदुमाधव ठाकरे, दुसऱ्या नंबरचे जयदेव ठाकरे आणि धाकटे चिरंजीव उद्धव ठाकरे...
बिंदुमाधव ठाकरे
बिंदुमाधव ठाकरे यांचा राजकारणाचा जास्त काही संबंध आला नाही. त्यांनी स्वत:ची व्हिडिओ कंपनी सुरू केली होती आणि नंतर फीचर फिल्म्सच्या निर्मितीकडे वळले. मात्र, 1996 मध्ये लोणावळा इथं त्यांचा अकाली मृत्यू झाला होता. मग त्यानंतर त्यांचं कुटुंब 'मातोश्री' हे ठाकरेंचं निवासस्थान सोडून बाहेर पडलं. बिंदुमाधव यांना दोन मुलं आहेत. निहार ठाकरे असं मुलाचं नाव आहे. तर नेहा ठाकरे असं मुलीचं नाव... निहार ठाकरे यांचा इंदापूरच्या हर्षवर्धन पाटलांच्या लेकीशी (अंकिता पाटील) विवाह झाला होता. त्यानंतर त्यांनी शिंदे गटाला समर्थन दिलंय. तर नेहा ठाकरे यांचं विवाह डॉ. मनन ठक्कर यांच्याशी झाला.
जयदेव ठाकरे
जयदेव ठाकरे हे उद्धव ठाकरे यांचे थोरले बंधू... बाळासाहेब ठाकरे यांच्या निधनानंतर संपत्तीवरून जयदेव ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांच्यातला वाद उफाळून आला होता. जयदेव ठाकरेंची तीन लग्न झाली. पहिल्या पत्नीचं नाव जयश्री ठाकरे. जयदेव आणि जयश्री यांना एक जयदीप नावाचा मुलगा आहे. जयदीप हे आर्ट डिरेक्टर आणि ग्राफीक्स डिझायनर आहेत. तर दूसरी पत्नी स्मिता ठाकरे यांच्यापासून राहूल आणि ऐश्वर्य अशी दोन मुलं आहेत. तर तिसरी पत्नी अनुराधा यांच्यापासून माधुरी नावाची मुलगी आहे.
बाळासाहेब ठाकरे यांची प्रकृती बरी नसताना उद्धव ठाकरेंकडून त्यांची दिशाभूल केली, असा आरोप जयदेव ठाकरे यांनी केला होता. बाळासाहेबांनी माझ्याजवळ त्यांनी मन मोकळं केलं होतं पण मी आत्ता बोलू शकत नाही कारण बोललो तर त्यावरून प्रचंड मोठा गदारोळ होईल, असं जयदेव ठाकरे यांनी झी 24 तासशी बोलताना म्हटलं होतं.
उद्धव ठाकरे
बाळासाहेबांचे तिसरे पुत्र उद्धव ठाकरे यांनी 1989 मध्ये रश्मी ठाकरे यांच्याशी विवाह केला. त्यांना दोन पुत्र आहेत. मोठा मुलगा आदित्य ठाकरे आणि दुसरा मुलगा तेजस ठाकरे... आदित्य ठाकरे राजकारणात सक्रिय आहेत. महाविकास आघाडी सरकारमध्ये ते मंत्री देखील होते. उद्धव ठाकरे यांच्यासह आदित्य ठाकरे खांद्याला खांदा लावून काम करताना दिसतात. तेजस ठाकरे राजकारणात येणार अशी चर्चा नेहमी होते. मात्र, त्यांनी कधी रस दाखवला नाही. मात्र, शिवसेनेत फूट पडल्यानंतर तेजस ठाकरे राजकीय मंचावर दिसू लागले आहेत. मुलगा तेजस हे वन्यजीव अभ्यासक म्हणजेच वाईल्डलाईफ रिसर्चर आहेत. नुकताच त्यांनी सापसुरळ्यांच्या नव्या कुळाचा आणि पाच नव्या प्रजातींचा शोध लावला होता.
श्रीकांत ठाकरे
बाळासाहेब ठाकरे यांचे धाडके बंधू श्रीकांत ठाकरे यांना कुंदा ठाकरे यांच्याशी विवाह झाला. श्रीकांत आणि कुंदा यांना दोन मुलं... एकाचं नाव राज ठाकरे (स्वरराज ठाकरे) आणि दुसऱ्या मुलीचं नाव जयवंती ठाकरे... राज ठाकरे यांचं नाव महाराष्ट्राच्या राजकारणाला माहित आहेतच... राज ठाकरे यांचा विवाह शर्मिला ठाकरे यांच्याशी झाला. त्यांना अमित ठाकरे आणि उर्वशी ठाकरे अशी दोन मुलं आहेत. उर्वशी ठाकरे फॅशन डिझायनर आहेत. तर राजपुत्र अमित ठाकरे देखील राजकारणात सक्रिय झाले आहेत. तर अमित ठाकरेंना मागील वर्षी पुत्रप्राप्ती झाली होती, त्याचं नाव 'किआन'.