Maharashtra Politics : महाराष्ट्राच्या राजकारणात खळबळजनक घडामोडी घडताना दिसत आहेत. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे 3 बडे नेते मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या भेटीसाठी गेले आहेत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या भेटीली गेलेले हे तीनही नेते उद्धव ठाकरे यांच्या जवळचे नेते आहेत. या भेटीची राज्याच्या राजकारणात जोरदार चर्चा रंगली आहे. मागील काही महिन्यांपासून शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासोबतची जवळीक वाढत असल्याचे दिसत आहे.
शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे आमदार मिलिंद नार्वेकर, माजी मंत्री सुभाष देसाई आणि अंबादास दानवे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या भेटीसाठी सागर बंगल्यावर दाखल झाले आहेत. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे स्मारकाच्याकामाच्या अनुषंगाने मुख्यमंत्र्यांसोबत बैठक असल्याची माहिती समोर येत आहे. मात्र, शिवसेनेचे तीन बडे नेते सागर बंगल्यावर दाखल झाल्यानं राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आले आहे.
विधानसभा निवडणुकीचा निकाल जाहीर झाल्यापासून शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष आणि भाजप यांच्यातील जवळीक वाढत असल्याचे दिसत आहे. राज्यात महायुतीचं सरकार आल्यापासून शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे नेते आणि देवेंद्र फडणवीसांच्या गाठीभेटी वाढल्याचे दिसत आहे. फडणवीस मुख्यमंत्री झाल्यापासून आदित्य ठाकरे यांनी अनेकदा त्यांची भेट घेतली. सत्ताधारी आणि विरोधक एकत्र मिळून चांगलं काम करू शकतात, असंही आदित्य ठाकरे म्हणाले होते. उद्धव ठाकरे यांनी देखील मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली होती.