Ballerina Victoria Daubervilles dance video : जगभरात कौशल्याची काहीच कमतरता नाही हे अगदी खरं असून दर दिवशी डोकं चक्रावणारे काही संदर्भ पाहून लगेचच लक्षात येतं. सध्या अशाच एका अद्भूत गोष्टीचा व्हिडीओ व्हायरल होत आहे. हा व्हिडीओ इंटरनेटव वारंवार पाहिला जात असून, तो जितक्या वेळा पाहिला जातोय तितक्यांदा त्याचं नावीण्य आणखी द्विगुणित होताना दिसत आहे. व्हिडीओमध्ये दिसणारं प्रत्येक दृश्य काळजाचा ठाव घेणारं असून, कलेप्रती या कलाकांची ओढ आणि समर्पण मन जिंकून जात आहे.
सोशल मीडियावर व्हायरल होणारा हा व्हिडीओ एक फ्रेंच डान्सर आणि कोरिओग्राफर व्हिक्टोरिया डॉबरविले हिचा असून, तिनं साऱ्यांना हैराण करून सोडलं आहे. व्हिक्टोरिया ही प्रशिक्षित बॅले डान्सर असून, यावेळी तिनं आपल्या नृत्य सादरीकरणासाठी एक वेगळं व्यासपीठ निवडलं. हा कोणता स्टेज नव्हता, समोर रसिकप्रेक्षकही नव्हते. तर, व्हिक्टोरियानं सादर केलेलं हे नृत्य पाहिलंय चक्क बर्फाच्छादित डोंगराने आणि अथांग समुद्राने.
हाडं गोठवणाऱ्या थंडीमुळं जगभरात आकर्षणाचा केंद्रबिंदू असणाऱ्या अंटार्क्टिका इथं एका क्रूझ शीपच्या शेंड्यावर व्हिक्टोरियानं बॅले नृत्य सादर केलं. आजुबाजूला फक्त तरंगणारे बर्फाचे मोठाले तुकडे, थंडीचा सर्वोच्च बिंदू गाठलेलं गोठवणारं पाणी आणि बर्फाचं अच्छादन असणारे पर्वत या वातावरणात नृत्य सादर करणाऱ्या व्हिक्टोरियाला पाहताना प्रत्येकजण भारावून जात आहे. जहाजाच्या शेवटावर व्हिक्टोरिया पोहोचते काय, तिथं पायांच्या अंगठ्यावर शरीराचा भार उचलून अगदी चावी दिलेल्या बाहुलीप्रमाणे बॅले डान्स करते काय.... हे सारंकाही चमत्कारिकच.
बॅलरिना व्हिक्टोरिया डॉबरविलेने अंटार्क्टिकातल्या गारठ्यात डान्स केला तेव्हा. तिचा जोडीदार मॅथ्यू फॉर्गेट यानं तिचं चित्रीकरण केलं. जगातील वेगवेगळ्या ठिकाणी बॅले या नृत्य प्रकाराला नेणं हा त्यांचा मुख्य हेतू आहे. हा व्हिडीओ इतक्या कमाल पद्धतीनं चित्रीत करण्यात आला आहे, की अनेकांनाच तो AI अर्थात आर्टिफिशिअल इंटेलिजन्सच्या मदतीनं तयार करण्यात आल्याचं भासलं. प्रत्यक्षात मात्र व्हिक्टोरियानंच तिच्या सोशल मीडियावर या खास मोहिमेतील फोटो आणि व्हिडीओ शेअर केले तेव्हा कुठे नेटकऱ्यांचा विश्वास बसला. तिचा हा व्हिडीओ पाहून तुम्ही काय म्हणाल?