Devendra Fadnavis On Ranveer Allahbadia Controversy: राज्याचे मुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी युट्यूबर आणि पॉडकास्टर रणवीर अलाहबादीयाविरोधात कारवाईचे संकेत दिले आहेत. 'बिअर बायसेप्स' चॅनेलमुळे प्रचंड लोकप्रिय झालेल्या रणवीर आता कॉमेडियन समय रैनाच्या 'इंडियाज गॉट लॅटंट' या कार्यक्रमातील एका प्रश्नामुळे वादात अडकला असतानाच आता थेट गृहमंत्र्यांनी या प्रकरणावर भाष्य केलं आहे.
रणवीर अलाहबादीयाने त्याच्या कार्यक्रमात कंबरेखालील प्रतिक्रिया दिली आहे. ही प्रतिक्रिया फारच वादग्रस्त आहे, असं म्हणत मुंबईमध्ये पत्रकारांनी फडणवीसांना याबद्दल प्रश्न विचारला. हा प्रश्न ऐकल्यानंतर फडणवीस यांनी," मला याची माहिती मिळाली आहे. मी अजून प्रत्यक्षात तो व्हिडीओ पाहिलेला नाही. फार घाणेरड्या पद्धतीने काही गोष्टी बोलल्या गेल्या आहेत, सादर केल्या गेल्याचं मला कळलं आहे. हे अत्यंत चुकीचं आहे," असं म्हटलं. तसेच पुढे बोलताना फडणवीसांनी अभिव्यक्ती स्वातंत्र्य असलं तरी त्याने इतरांच्या स्वातंत्र्यावर अतिक्रमण होता कामा नये, अशी अपेक्षा व्यक्त केली.
"सर्वांना अभिव्यक्ती स्वातंत्र्य आहे. मात्र आपलं अभिव्यक्ती स्वातंत्र्य तेव्हा संपतं जेव्हा आपल्या या स्वातंत्र्यामुळे इतराच्या स्वातंत्र्यावर अतिक्रमण करतं. अशाप्रकारचं अतिक्रमण करणं योग्य नाही. अभिव्यक्तीचीही काही मर्यादा आहे. आपल्या समाजात आपण अश्लीलतेचेही काही नियम तयार केले आहेत. या नियमांचं कोणी उल्लंघन करत असेल तर ही फार चुकीची गोष्ट आहे. असं काही घडलं असेल तर त्याच्याविरोधात कारवाई व्हायला हवी," असं फडणवीस यांनी म्हटलं आहे.
स्टॅण्डअप कॉमेडी करणाऱ्या नवतरुणांना संधी देणाऱ्या समय रैनाच्या युट्यूब चॅनेलवरुन वेबकास्ट होणाऱ्या कार्यक्रमात रणवीर पाहुणा परिक्षक म्हणून सहभागी झाला होता. युट्यूबवर एक कोटींहून अधिक फॉलोअर्स असलेल्या रणवीरने या कार्यक्रमातील एका स्पर्धकाला अत्यंत आक्षेपार्ह प्रश्न विचारला. "तुला तुझ्या पालकांना आयुष्यभर सेक्स करताना पाहायला आवडेल की त्यामध्ये सहभागी होऊन हा प्रकार कायमचा संपवायला आवडेल?" असा प्रश्न रणवीरने विचारला. या शोमध्ये सोशल मीडियावरील स्टार असलेले आशिष चंचलानी, जसप्रीत सिंग, अपूर्व मुखेजाही सहभागी झाले होते.
दरम्यान, रणवीर अलाहबादीयाने या प्रकरणामध्ये आपल्या एक्स (आधीचं ट्विटर) अकाऊंटवरुन माफी मागितली आहे. "इंडियाज गॉट लॅटंटमध्ये मी जे काही म्हणलं तो बोलायला नको होतं. मी माफी मागतो. मी जे काही बोललो ते अजिबात योग्य नव्हतं. ते विधानही मजेशीर नव्हतं. विनोद हा काही माझा पींड नाही, मी आता फक्त माफी मागण्यासाठी आलो आहे," असं रणवीर अलाहबादीयाने म्हटलंय.