Pankaja Munde : महाराष्ट्राच्या राजकारणात सध्या मोठ्या घडामोडी घडत आहेत. अशातच महाराष्ट्रात आणखी एक नवा पक्ष निर्माण होणार का? अशी चर्चा रंगली आहे. भाजप नेत्या आणि राज्याच्या पर्यावरण मंत्री पंकजा मुंडे (Pankaja Munde) यांनी भाजपचे दिवंगत नेते गोपीनाथ मुंडे (Gopinath Munde) यांचे नाव घेत एक सूचक वक्तव्य केले. त्यांच्या या वक्तव्यावर राष्ट्रवादी अजित पवार गटाचे ज्येष्ठ नेते छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) यांनी देखील प्रतिक्रिया दिली. पण खरचं नवीन पक्ष काढणार का? याबाबत पंकजा मुंडे यांनी जाहीर सभेत खुलासा केला आहे.
गोपीनाथ मुंडे यांनी भाजप पक्ष उभा केला. गोपीनाथ मुंडे साहेबांवर प्रेम करणाऱ्या लोकांना एकत्र गोळा केले तर एक वेगळा पक्ष उभा राहील, असे वक्तव्य पंकजा मुंडे यांनी केले होते. यानंतर पंकजा मुंडे नवा पक्ष स्थापन करणार असल्याची चर्चा रंगली होती. त्यातच छगन भुजबळ यांनी देखील गोपीनाथ मुंडे यांच्याशी निगडीत एक किस्सा सांगितला. मी उपमुख्यमंत्री होतो, 2002 हे वर्ष असेल. गोपीनाथराव मुंडे माझ्याकडे आले आणि एक वेगळा पक्ष काढू असे म्हणाले. तुम्ही, मी आणि गणपतराव देशमुख, आठवले एक पक्ष काढू. पक्ष चांगल्या रीतीने पुढे जाईल, मी उपमुख्यमंत्री होतो मला राजीनामा द्यावा लागेल. ते उपनेते होते त्यांना राजीनामा द्यावा लागेल म्हंटल. मी सांगितले मला काही हरकत नाही. इतर लहान घटकांना घेऊन पक्ष निघत असेल तर हरकत नाही म्हंटले. नंतर त्यांनी तो विषय सोडून दिला.
ओबीसीचा पक्ष निघत असेल तर हरकत नाही अशी प्रतिक्रिया छगन भुजबळ यांनी दिली. शिवसेना ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांनी पंकजा मुंडेंना नव्या पक्षासाठी शुभेच्छा देखील दिल्या.
मोठे मोठे स्वप्न पाहणारे दुसऱ्याच्या जीवावार पाय ठेवू कधीच मोठं होत येत नाही. माझ्या रक्ताच्या थेंबात राजकारण आहे. आमच्याकडे एकनिष्ठा आहे. मी पक्षासोबत एकनिष्ठ आहे. मी कशाला नवा पक्ष स्थापन करेन? असा जाहीर खुलासाच पंकजा मुंडे यांनी एका जाहीर कार्यक्रमात केला.