Earth Rotation Video: जीवसृष्टीचं पृथ्वीवर असणारं अस्तित्वं हे एक कोडं असून, हे नेमकं कसं शक्यंय हाच प्रश्न अनेकांच्या मनात घर करतो. ही पृथ्वी अवकाशात नेमकी कशा पद्धतीनं परिभ्रमण आणि परिक्रमण करते इथपासून पृथ्वीच्या या गतीचा मानवाला कधी अंदाज का येत नाही, इथपर्यंतचे प्रश्न सातत्यानं मनात घर करत असतात.
संशोधकांनी आजवर याच पृथ्वीविषयी काही अशी निरिक्षणंसुद्धा नोंदवली जिथं पृथ्वीच्या गतीविषयी तर्क लावण्यात आले. अभ्यासही झाला आणि अखेर याचे निष्कर्षही समोर आले. मुळा पृथ्वी जरी परिभ्रमण आणि परिक्रमण करत असली तरीही त्याची जाणीव प्रत्यक्षात मात्र होत नाही. पण, दिवसरात्रीचं चक्र हा त्याचाच एक परिणाम आहे ही बाबही तितकीच महत्त्वाची. याच पृथ्वीच्या गतीचा आढावा घेत एक कमाल व्हिडीओ नुकताच सोशल मीडियावर शेअर करण्यात आला आहे.
व्हायरल होणाऱ्या या व्हिडीओमध्ये आभाळ जागच्या जागी स्थिर असून, दिवस- रात्रीच्या प्रकाशाचा तितका फरक इथं पाहायला मिळत आहे. तर, पर्वत, घरं आणि मैदानं मात्र या आभाळाभोवती फिरताना दिसत आहेत. अवघ्या 1.11 मिनिटांच्या या व्हिडीओमधील दृश्य एकटक पाहिल्यास ही गती नजर रोखून एका क्षणाला पाहणाऱ्य़ांचंही डोकं चक्रावून जाते.
Indian Institute of Astrophysics, Bengaluru येथील दोरजे अंगचुक नावाच्या इंजिनिअरनं हा व्हिडीओ चित्रीत करत तो X वर शेअर केला आहे. कॅमेरा एका ठिकाणी स्थिर करत पृथ्वीची गती अतिशय सुरेखपणे या व्हिडीओमध्ये कॅमेरानं कैद केल्याचं लक्षात येत आहे. सहसा पृथ्वीसंदर्भातील ही अशी निरीक्षणं आणि आकाशातील ताऱ्यांचे भन्नाट खेळ हे अद्भूत दृश्य लडाखमधील हानले या गावात पाहायला मिळतात.
A Day in Motion – Capturing Earth’s Rotation
The stars remain still, but Earth never stops spinning. My goal was to capture a full 24-hour time-lapse, revealing the transition from day to night and back again. @IIABengaluru @asipoec (1/n) pic.twitter.com/LnCQNXJC9R
— Dorje Angchuk (@dorje1974) January 31, 2025
हानलेमध्ये दूरदूरपर्यंत मानवी वस्ती नसल्यामुळं प्रकाशाअभावी इथं असणाऱ्या रात्री अतिशय काळोख्या असून, अनेकदा आभाळात चांदण्यांचीच दाटी पाहायला मिळते. इतकंच नव्हे, तर कित्येकदा इथं समांतर विश्वातील काही आकाशगंगांचीही झलक पाहता येते. जगातील सर्वात उंचीवर स्थित असणारी ऑब्जर्वेटरी इथंच असून, अवकाशाविषयीच्या कैक संकल्पना इथं सोप्या पद्धतीनं अनुभवता येतात असं म्हणणं गैर ठरणार नाही.