मुलं Cold Drinkचा नाद सोडेना; 8 हजार लोक वस्तीच्या गावानं घेतला ऐतिहासिक निर्णय!

Cold Drink:  कोल्ड ड्रिंक आणि एनर्जी ड्रिंक विक्रीवर बंदी घालण्यात आलीये. 

Pravin Dabholkar | Updated: Feb 10, 2025, 09:01 PM IST
मुलं Cold Drinkचा नाद सोडेना; 8 हजार लोक वस्तीच्या गावानं घेतला ऐतिहासिक निर्णय! title=
कोल्ड ड्रिंक बंदी

Cold Drink: कोल्ड ड्रिंक हे लहान मुलांचं आवडीचं पेय. पण याच कोल्ड ड्रिंकमुळे शरिराचं नुकसान होतंय. विशेषत: लहान मुलांसाठी हे कोल्ड ड्रिंक घातक ठरतंय. कोल्ड ड्रिंकच्या नुकसानाबद्दल पालक मुलांना वारंवार समजावत असतात पण त्याची चव किंवा जाहिरातीचा परिणाम यामुळे मुले काही कोल्ड ड्रींकचा नाद सोडायला मागत नाहीत. हेच टाळण्यासाठी आता पेडगाव ग्रामपंचायतीने महत्वाचा ठराव केलाय. या गावात आता शीतपेय म्हणजेच कोल्ड ड्रिंक आणि एनर्जी ड्रिंक विक्रीवर बंदी घालण्यात आलीये. या ठरावाचं गावकऱ्यांसोबतच व्यावसायिकांनीही स्वागत केलंय.

ठरावाला पाठिंबा

ग्रामपंचायत कार्यालयांकडून अनेकदा वेगवेगळ्या विषयावर ठराव केले जातात. गावकऱ्यांचा विचार करून निर्णय घेतले जातात. असाच एक महत्त्वाचा ठराव अहिल्यानगरच्या श्रीगोंदा तालुक्यातील पेडगाव ग्रामपंचायतीने केलाय.गावातील लहान मुलांच्या आरोग्याची काळजी घेत गावात शीतपेय आणि एनर्जी ड्रिंक्स विक्री बंद करण्याचा ठराव केला गेला. या ठरावाला पाठिंबा देत ग्रामस्थांनीही याची अंमलबजावणी सुरू केलीये.

कोल्ड्र ड्रिंकचे दुष्परिणाम 

कोल्ड्र ड्रिंकचे दुष्परिणाम काय असतात हे समजून घेऊया. कोल्ड ड्रिंकमुळे मुलांमध्ये लठ्ठपणाचा धोका वाढतो. अतिसाखरेमुळे मुलांच्या दातांचं नुकसान होतं.पचनासंबंधित समस्या निर्माण होतात.कोल्ड्रिंकच्या सेवनाने हाडं कमकुमत होतात.शरिरात पाण्याची कमतरता जाणवते. स्मरणशक्तीवर परिणाम होण्याची शक्यता असते.

 एनर्जी ड्रिंकच्या अति सेवनामुळे मृत्यू 

पेडगाव हे साधारण 8 हजार लोक वस्तीचं गाव आहे. या गावांमध्ये 3 शाळा आहेत आणि जवळपास 1 हजार विद्यार्थी आहेत. काही दिवसापूर्वी गावातील एका विद्यार्थ्याचा एनर्जी ड्रिंकच्या अति सेवनामुळे मृत्यू झाल्याची घटना घडली आणि तेव्हापासून गावात शीतपेय आणि एनर्जी ड्रिंक विक्रीला विरोध सुरू झाला.

निर्णयाचं विद्यार्थी आणि पालकांकडून स्वागत

व्यावसायिकांनी मान्य केला तसा ग्रामस्थांनीही हा ठराव मान्य केला. लहान मुलांच्या आरोग्यासाठी घेतलेल्या या निर्णयाचं विद्यार्थी आणि पालकांनी स्वागत केलंय.मुलांच्या आरोग्याचा विचार करून पेडगाव ग्रामपंचायतीने घेतलेला हा निर्णया कौतुकास्पद आहे. पेडगावचा हा आदर्श राज्यातील इतरही ग्रामपंचायतींनी घेण्याची गरज आहे.