महाराष्ट्रात सेमी-हाय-स्पीड सुपरफास्ट ट्रेन! नागपूर पुणे 10 तसांचा प्रवास फक्त 3 तासांत, नागपूर मुंबई प्रवासाचे 6 तास वाचणार

नागपूरहून पुणे 3 आणि मुंबईत 10 तासांत पोहोचता येणार आहे. या मार्गावर वंदे भारत स्लीपर सुरु करण्याचा प्रस्ताव आहे. 

वनिता कांबळे | Updated: Feb 10, 2025, 08:49 PM IST
महाराष्ट्रात सेमी-हाय-स्पीड सुपरफास्ट ट्रेन! नागपूर पुणे 10 तसांचा प्रवास फक्त 3 तासांत, नागपूर मुंबई प्रवासाचे 6 तास वाचणार title=

Vande Bharat Express :  महाराष्ट्रात सेमी-हाय-स्पीड सुपरफास्ट ट्रेन धावणार आहेत. या सुपरफास्ट ट्रेनमुळे नागपूरकरांचा प्रवास सुसाट होणार आहे. नागपूरला पुणे आणि मुंबईशी जोडणारी सेमी-हाय-स्पीड सुपरफास्ट ट्रेन सेवा अर्थात वंदे भारत स्लीपर  (Vande Bharat Express) धावणार आहे. यामुळे नागपूर पुणे प्रवास फक्त 3 तासांत पूर्ण होणार आहे. तर, नागपूर मुंबई प्रवासाचे 6 तास वाचणार आहेत. 

दोन वंदे भारत स्लीपर ट्रेनसाठी नागपूर रेल्वे विभागाकडून केंद्रीय बोर्डाकडे प्रस्ताव पाठवण्यात आला आहे. या प्रस्तावाला सकारात्मक प्रतिसाद मिळाला आहे.   महाराष्ट्राला लवकरच दोन वंदे भारत स्लीपर ट्रेन मिळणार आहे. नागपूर-मुंबई आणि नागपूर-पुणे वंदे भारत स्लीपर ट्रेन सुरू करण्याचा प्रस्ताव आहे. या ट्रेन सुरु झाल्यास प्रवाशांचा वेळ वाचणार आहे. त्याशिवाय आरामदायी प्रवासही होणार आहे.

वंदे भारत एक्सप्रेस ट्रेनमुळे नागपूर ते पुणे हे अंतर फक्त तीन तासांवर येणार आहे.  सध्या नागपूर-पुणे या रेल्वे मार्गावर सुपरफास्ट एक्सप्रेस आणि गरीबरथ एक्सप्रेस धावतात. या एक्सप्रेस आठवड्यातून तीन वेळा तर हमसफर एक्सप्रेस आठवड्यातून एकदाच धावते. नागपूर-पुणे या मार्गावर प्रवास करणाऱ्या प्रवाशांची संख्या मोठी आहे. मात्र, या मार्गावर धावणाऱ्या रेल्वेची संख्या खूपच मर्यादित आहे. वंदे भारत एक्सप्रेस सुरू झाल्यास प्रवाशांना मोठा दिलासा मिळणार आहे. विशेष म्हणजे नागपूर ते पुणे असा दहा तासांचा प्रवास फक्त तीन तासांत होणार आहे. 

नागपूर ते मुंबई मार्गावर प्रवास करणाऱ्यांचा प्रवास देखील अती जलद होणार आहे.  सध्या नागपूर ते मुंबई रेल्वे  प्रवासासाठी सुमारे 16 तास लागतात, तर सुपरफास्ट एक्सप्रेसने 12 ते 13 तासांत हा प्रवास पूर्ण होतो. दुरांतो एक्सप्रेस ही या मार्गावरील सर्वात जलद एक्सप्रेस आहे. दुरांतो एक्सप्रेस 12 तासांच्या नागपूरला पोहचते. मात्र, वंदे भारत स्लीपर सुरू झाल्यास नागपूर-मुंबई प्रवास 10 तासांत पूर्ण होणार आहे. प्रवाशांचे तब्बल 6 तास वाचणार आहेत.