प्रवीण तांडेकर, झी मीडिया, भंडारा : बियाणे कंपन्यांकडून शेतकऱ्यांची लूट होण्याचे प्रकार सर्व जिल्ह्यात वाढू लागले आहेत. यावर राज्य सरकारने कडक कायदे आणूनही बियाणे कंपन्यांची मुजोरी कमी होताना दिसत नाही. यामुळे शेतकरी राजाला रडकुंडीला येण्याची वेळ येते. भंडारा जिल्ह्यातील जांभोरा येथे एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. यामध्ये बोगस बियाणामुळे शेतकऱ्याच्या वर्षभराच्या मेहनतीचे पाणी झाले आहे. काय आहे ही घटना? सविस्तर जाणून घेऊया.
मोहाडी तालुक्यांतील जांभोरा येथील शेतकरी ज्ञानेश्वर समरित यांच्याकडे 2 एकर शेती आहे. त्यांची बियाणे कंपनीकडून घोर फसवणूक झाली आहे. त्यांनी शेतात पिकवलेले धान 135 ते 140 दिवसात निघणारे होते. पण कंपनीच्या बियाणामुळे हे धान 80 दिवसात निघाल्याने आता शेतकरी अडचणीत सापडला आहे.
दर वर्षी ज्ञानेश्वर हे आपल्या शेतात 140 दिवसात निघणारे धान लागवड करतात. या वर्षी देखील त्यांनी पालोरा येथिल कृषि केंद्रातून 140 दिवसांत निघणार बायर कंपनीचा 6444 गोल्ड वाणाचा बियाणे खरेदी केली. पेरणी करुण धान लागवडदेखील केली. हे धान 140 दिवसात निघेल असे शेतकऱ्यांना माहिती होती. पण हे धान 80 दिवसातच निघाले असल्याने शेतकऱ्यांना मोठा प्रश्न पडला आहे.
समरित यांच्या शेती परीसरात तलाव असल्याने परिसरातील शेती नेहमी पाण्याखाली असते. त्यामुळे सर्व शेतकरी 140 दिवसात निघणारी धान लागवड करतात. पण त्यांचे धान 80 दिवसात निघाल्याने 10 दिवसात हेच धान कापणीला येणार आहे.
परंतु शेतात पाणी असल्याने धान कापायचे कसे? असा प्रश्न शेतकऱ्यांना पडला आहे. त्यामुळे यंदा त्यांच्या शेतात शेती पिकली खरी पण हातात अन्नाचा दाना देखील येणारं नाही. त्यामुळे आता बायर कंपनीने शेतीची पाहणी करून नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी शेतकरी करीत आहे.
मी बायर कंपनीचे धान घेतले. 135 दिवसात धान येते पण 80 दिवसानी हे धान आले. त्यामुळे हे धान कापावे कसे हे कळत नाही. लोकांचे भारी धान आहे. माझे धान हलके लागले. मी याची तक्रार केली पण माझ्याशी कोणी संपर्क केला नाही. मला बायर कंपनीने नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी शेतकरी ज्ञानेश्वर यांनी केली आहे.