रवींद्र कांबळे, झी मीडिया, सांगली : सांगलीत आज कुस्तीचा थरार रंगणार आहे. पण ही नेहमीसारखी कुस्ती नाही. ही आहे बेमुदत निकाली महाकुस्ती... लोखंडी पिंज-यातली महाकुस्ती...कशी असते हे पिंज-यातली कुस्ती, पाहूयात हा खास रिपोर्ट...
कुस्ती म्हणजे आखाडा... आखाड्यातली लाल माती... कडाडणारी हलगी... प्रेक्षकांचे चित्कार आणि एकमेकांना चीतपट करण्यासाठी भिडलेले मल्ल.... ही झाली पारंपरिक कुस्ती... ऑलिम्पिक स्पर्धांमध्ये पदक जिंकण्यासाठी मॅटवर रंगणारी कुस्तीही आपल्या परिचयाची आहे...आतापर्यंत WWE चॅम्पियनशीपसाठी लोखंडी पिंज-यातली रक्तरंजित फायटिंग आपण पाहिली...बॉलिवूड आणि हॉलिवूडच्या सिनेमातही लोखंडी पिंज-यातल्या उत्कंठावर्धक रोमांच आपण अनुभवला...
आता येत्या 18 जानेवारीला कुस्तीच्या पंढरीत, सांगलीमध्ये, कुस्तीचा हाच आगळावेगळा डाव रंगणाराय... डॉ. बाबासाहेब आंबेडकर मैदानावर बंद लोखंडी पिंज-यातली निकाली महाकुस्ती खेळवली जाणाराय. महाराष्ट्र केसरी स्पर्धेत उपविजेता ठरलेला पैलवान किरण भगत आणि बेल्जियममध्ये सराव करणारा भारतीय पैलवान, WWE चॅम्पियन मनजीतसिंग यांच्यात हा कुस्तीचा आगळावेगळा सामना रंगणार आहे.
सांगलीत 18 जानेवारीला पैलवान-कुस्तीप्रेमी संघटनेची स्थापना होतेय. यानिमित्तानं महाराष्ट्र चॅम्पियन पैलवान मारुती जाधव यांच्या संकल्पनेतून या बंद लोखंडी पिंज-यातील महाकुस्तीचं आयोजन करण्यात आलंय...
लोखंडी पिंज-यात किरण भगत आणि मनजीतसिंग या दोन पैलवानांना बंद केलं जाईल.
या पिंज-याला बाहेरून कुलूप लावलं जाईल.
जोपर्यंत एक पैलवान थकून हरणार नाही, तोपर्यंत ही निकाली कुस्ती सुरूच राहिल.
जो पैलवान जिंकेल तो स्वतः पिंज-याच्या बाजूला असलेल्या किल्लीनं कुलूप खोलून बाहेर येईल..
किरण भगत आणि मनजीतसिंगपैकी कोण बाजी मारणार, याकडं तमाम कुस्तीप्रेमींचं लक्ष लागलंय. यानिमित्तानं खंडीत झालेली पिंज-यातल्या कुस्तीची परंपरा पुन्हा एकदा सुरू होतेय...