अमित जोशी, प्रतिनिधी, झी मीडिया, मुंबई : शेतकरी संप प्रकरणवरून राज्यातील परिस्थिती ढवळून निघाली आहे. असं असतांना या संपाला सामोरे जातांना फक्त मुख्यमंत्री दिसत आहेत. भाजपामधील इतर सहकारी मंत्री - नेते हे शेतकरी यांच्याशी चर्चा करतांना, मुख्यमंत्री यांना साथ देतांना दिसत नाहीयेत. यामुळे शेतकरी संपावरून मुख्यमंत्री एकाकी पडल्याचे चित्र आहे.
शेतकरी संपाबद्दल ग्रामीण भागांत तीव्र भावना आहेत. विरोधकांच्या संघर्ष यात्रेनं जे साध्य झालं नाही, ते या शेतकरी आंदोलनामुळे होतांना दिसतंय. त्यामुळे विरोधकही सरकारवर जोरदार तुटून पडतायत, मात्र या शेतकरी संप प्रकरणाचा सरकारी पातळीवर एकजूटपणे सामना होताना दिसत नाही.
एकाकी पडलेल्या सदाभाऊ खोत यांना हाताशी धरत मुख्यमंत्री शेतकरी प्रतिनिधींना सामोरे गेले. शेतकरी संपावर तोडगा काढण्याबाबत भाजपचा एकही बडा नेता किंवा मंत्री पुढे आला नाही. सुधीर मुनगंटीवार, विनोद तावडे, रावसाहेब दानवे, पंकजा मुंडे यांनी पाठ फिरवली.
संप झाला तरी भाजीपाला आयात करू, असं वक्तव्य प्रमुख प्रवक्ते माधव भांडारींनी केलं. भांडारींच्या वक्तव्यामुळे आगीत तेल ओतले गेले आणि पक्ष आणखी अडचणीत आला.
शेतकरी संपात मुख्यमंत्र्यांनीच फूट पाडल्याचा संदेश सगळीकडे गेला. त्यानंतरही मुख्यमंत्र्यांच्या मदतीला कुणी आलं नाही. शिवसेना, राजू शेट्टी यांनी संपाला पाठिंबा दिल्यानं मुख्यमंत्र्यांची अडचण आणखी वाढली.
मुख्यमंत्र्यांना खिंडीत गाठायची संधी विरोधकांसह भाजपमधला मुख्यमंत्री विरोधी गट शोधत होता. मात्र जे मराठा मोर्चा, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमुळे झाले नाही ते शेतकरी संपामुळे झाल्याचं दिसतंय. त्यामुळे राज्यातलं वातावरण तापलं असतांना एकाकी पडलेले मुख्यमंत्री यातून कसा मार्ग काढतात हे पाहाणे महत्वाचे ठरणार आहे.