CM Eknath Shinde Birthday Supports Banners At New York Times Square: महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा आज वाढदिवस (CM Eknath Shinde Birthday). मुख्यमंत्रीपदी विराजमान झाल्यानंतर एकनाथ शिंदेंचा हा पहिलाच वाढदिवस. जून महिन्याच्या शेवटच्या दिवशी महाविकास आघाडीपासून फारकत घेत शिंदेंनी भाजपाबरोबर राज्यात नवं सरकार स्थापन केलं. एकनाथ शिंदे आणि त्यांच्या समर्थक आमदारांच्या या कृतीमुळे महाराष्ट्रात राजकीय भूकंप झाला. देशभरातील प्रसारमाध्यमांबरोबरच परदेशातील प्रसारमाध्यमांनीही या घडामोडींची दखल घेतली.
मुख्यमंत्री शिंदेंनी अनेकदा जाहीर भाषणांमध्ये 33 देशांनी आपल्या बंडाची दखल घेतल्याचा दावाही केला. यावरुन शिंदेंच्या विरोधकांनी त्यांना टोलेही लगावले. शिंदेंच्या बंडाची आंतरारष्ट्रीय दखल सुद्धा विरोधक आणि सत्ताधाऱ्यांच्या वादाची चर्चा ठरल्याचं पहायला मिळालं असतानाच शिंदेंचा मुख्यमंत्री म्हणून पहिला बर्थ डे थेट अमेरिकेतील न्यूयॉर्क शहरामधील जगप्रसिद्ध टाइम्स स्वेअरवर साजरा करण्यात आला.
अमेरिकेत राहाणाऱ्या काही भारतीय तरुणांनी राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना शुभेच्छा देणारे बॅनर्स थेट टाइम्स स्वेअरमध्ये झळकावल्याचं पहायला मिळालं. युवासेनेच्या कोअर कमिटीचे सदस्य नितील लांडगेंच्या पुढाकाराने थेट अमेरिकेमध्ये ही बॅनरबाजी करण्यात आली. या बॅनरवर 'हॅपी बर्थ डे अनस्टॉपेबल सीएम... एकनाथ शिंदे साहेब' अशा ओळी लिहिण्यात आल्या आहेत.
शिंदेंच्या वाढदिवसानिमित्त छापलेले विशेष बॅनर टाइम्स स्वेअरमधील ग्रॅण्ड सेंट्रल परिसरामध्ये झळकावण्यात आले. या बॅनर्सचे फोटो सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरत आहेत. शिंदेंच्या वाढदिवसाचे बॅनर तयार करून ते टाईम्स स्क्वेअर आणि ग्रँण्ड सेंट्रल येथे झळकवण्यात आले.
राज्याच्या वेगवगेळ्या भागांमध्ये शिंदे गटाच्या कार्यकर्त्यांकडून मुख्यमंत्री शिंदेंचा वाढदिवस मोठ्या उत्साहामध्ये साजरा केला जात आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यासाठी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस ठाणे येथील निवासस्थानी गेले होते. फडणवीस यांनी फोटो पोस्ट करत यासंदर्भातील माहिती दिली होती.
महाराष्ट्राचे लोकप्रिय मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांना वाढदिवसानिमित्त अनेकानेक शुभेच्छा! त्यांना उत्तम आरोग्य आणि दीर्घायुष्य लाभावे, या शुभकामना!
आज सकाळी त्यांच्या ठाणे येथील निवासस्थानी भेटून मनःपूर्वक शुभेच्छा दिल्या !@mieknathshinde pic.twitter.com/f9tcxt2CF6— Devendra Fadnavis (@Dev_Fadnavis) February 9, 2023
शिंदे यांना ओवळा-माजीवाडा मतदारसंघाचे आमदार प्रताप सरनाईक यांनी चांदीचा धनुष्यबाण भेट दिला. एकीकडे धनुष्यबाण हे निवडणूक चिन्ह कोणाचं यासंदर्भातील लढाई सर्वोच्च न्यायालयामध्ये आणि निवडणूक आयोगासमोर सुरु असतानाच दुसरीकडे सरनाईक यांनी अशी भेट दिल्यामुळे राजकीय चर्चा रंगू लागली आहे. मुख्यमंत्री शिंदेंनी त्यांच्या वाढदिवसानिमित्त ठाणेकरांना कोपरी पूलाचं उद्घाटन करुन एक अनोखी भेट दिली. कोपरी पुलामुळे ठाण्यातून मुंबईत येणाऱ्या वाहनांचा प्रवास अधिक वेगवान होणार आहे.