दीपक भातुसे, झी मीडिया, मुंबई : विरोधात बसण्याची भूमिका घेणाऱ्या काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसने शिवसेनेबरोबर जाण्याचे दरवाजे खुले असल्याचे स्पष्ट संकेत दिले आहेत. शरद पवारांनी काल काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांची भेट घेतली. पवार आज मुंबईत परतणार असून राज्यातील राष्ट्रवादीच्या नेत्यांशी चर्चा करून दोन दिवसात ते पुन्हा सोनिया गांधींना भेटणार आहेत. विरोधी पक्षात बसायचे असते तर हा सगळा खटाटोप करण्याची गरज नव्हती.
शिवसेना भाजपा सरकार स्थापन करण्यात अपयशी ठरले, तर कुणाचे तरी सरकार यावे लागेल, त्यासाठी आमच्याकडे कुणाचा प्रस्ताव आला तर त्यावर आम्ही विचार करू अशी प्रतिक्रिया राष्ट्रवादी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष जंयत पाटील यांनी 'झी २४ तास'ला दिली आहे.
मात्र शिवसेनेबरोबर जाण्याचा पर्याय खुला असल्याने काँग्रेस, राष्ट्रवादीच्या गोटात या राजकीय घडामोडी घडत आहेत. दुसरीकडे राज्यातील जनभावना ही भाजपा विरोधात असल्याचे पवारांनी सोनिया गांधींना सांगितले आहे. याचाच अर्थ जनभावना लक्षात घेऊन भाजपाला सत्तेपासून दूर ठेवायला हवं असं शरद पवारांनी सोनिया गांधींना पटवून देण्याचा प्रयत्न केला असल्याची चर्चा आहे. त्यामुळेच पवारांच्या पुढील खेळीकडे सगळ्यांचं लक्ष लागलंय.