मुंबई : कोरोनाचा धोका अजून टळलेला दिसत नाही. अशातच आता नवे वेरिएंट्स चिंता वाढवू लागले आहेत. सध्या डेल्टा प्लसने थैमान घातलं असून राज्यात अजून एका रूग्णाचा डेल्टा प्लसने बळी घेतला आहे. बीड जिल्ह्यात एका रूग्णाचा डेल्टा प्लसमुळे मृत्यू झाला आहे. यामुळे आता राज्यात डेल्टामुळे झालेल्या मृत्यूंची संख्या 5 वर जाऊन पोहोचली आहे.
‘डेल्टा प्लस’ बाधितांपैकी पाच जणांचा मृत्यू झाला आहे. यामध्ये रत्नागिरीतील दोन, तर मुंबई, बीड आणि रायगड मध्ये प्रत्येकी 1-1 रुग्णाचा मृत्यू झाला आहे. दरम्यान आता ठाणे जिल्ह्यात आणखी एका डेल्टा प्लसच्या रुग्णाची नोंद झाली आहे. यामुळे आता राज्यात डेल्टा प्लस बाधितांची एकूण संख्या 66 झाली आहे. बाधितांपैकी दहा जणांनी कोरोना लसीचे दोन डोस घेतले होत.
डेल्टा प्लसने मृत्यू झालेले पाचही रुग्ण 65 वर्षांवरील होते आणि त्यांना अतिजोखमीचे आजार होते. या पाच जणांपैकी दोन जणांनी कोविशिल्ड लसीचे दोन डोस घेतले होते, तर दोघांनी कोणतीही लस घेतेलेली नव्हती. मृत्यू झालेल्या एका रुग्णाच्या लसीकरणाबाबत अद्याप माहिती मिळालेली नाही, असे आरोग्य विभागाकडून सांगण्यात आलं आहे.
शुक्रवारी राष्ट्रीय विषाणू विज्ञान संस्थेने ठाणे जिल्ह्यात 50 वर्षांच्या महिलेला डेल्टा प्लसची बाधा झाल्याची माहिती दिली. या महिलेला 22 जुलैला कोरोनाची बाधा झाली होती आणि आता ती बरी देखील झाली आहे. आत्तापर्यंत आढळलेल्या 66 डेल्टा प्लस रुग्णांपैकी 32 पुरुष आणि 34 महिला आहेत. बाधितांपैकी 31 रुग्ण लक्षणंविरहित किंवा सौम्य लक्षणं असल्याने रुग्णालयात भरती करण्याची आवश्यकता नसलेले होते.