औरंगाबाद : कुटुंबाला कोरोना झाल्याच्या संशयातून पैठणच्या सोनवाडी गावात तुंबळ हाणामारी झाली. यात पाच जण जखमी झाले आहेत. या गावातील एक तरुण पुण्यात कामाला होता. काही दिवसंपूर्वीं तो गावात परतला. तुला कोरोना झालाय, असे म्हणत हटकले. यावरुन त्या तरुणाला मारहाण करण्यात आली. दरम्यान, पुणे जिल्ह्यातील बारामतीही असाच प्रकार घडला. होम कोरंटाईन असलेल्या लोकांना बाहेर फिरू देऊ नये, असे सांगणाऱ्या युवकाला काही जणांनी मारहाण केली.
पुण्यातून आलेला तरुण खरेदीसाठी दुकानात गेला असताना गावातील काही तरुणांनी तुला कोरोना झाला आहे, फिरू नकोस, अशी दमदाटी केली. त्यातून तो मुलगा आणि गावकरी यांच्यात हाणामारी झाली. त्या मुलाचे कुटुंब आणि गावकरी यांच्यात लाठ्या काठ्या ने हाणामारी झाली. या प्रकरणी पैठणच्या पाचोड पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवण्यात आला आहे.
दरम्यान, बारामतीत पोलिसांवर हल्ला करण्यात आला. कोरोनाचे संकट असल्याने संपूर्ण राज्यात संचारबंदी आहे. होम कोरोटईन असलेल्या लोकांना बाहेर फिरू देऊ नये, असे सांगणाऱ्या युवकाला काही जणांनी मारहाण केली. त्यानंतर तेथे गेलेल्या पोलीस पथकावर बारामती शहरातील काही जणांनी जोरदार हल्ला चढवला. होम क्वारंटाईन नागरिकांचा पोलिसांवर हल्ला केल्याने संताप व्यक्त होत आहे. हल्ला करणारे १४ जण पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. या हल्ल्यात पोलीस निरीक्षक औदुंबर पाटील यांच्यासह तीन अधिकारी आणि सहा कर्मचारी जखमी झाले आहेत.
हल्ल्यात अनेकांच्या हाताला जोरदार मार लागला असून अनेकांच्या डोक्यात काठ्या घालण्यात आल्या आहेत तर काही जणांना दगडाने देखील मारहाण करण्यात आलेली आहे. या हल्ल्यात पोलीस निरीक्षक औदुंबर पाटील, सहाय्यक पोलीस निरीक्षक अश्विनी शेंडगे, फौजदार पद्मराज गंपले , योगेश शेलार, पोलीस कर्मचारी पोपट कोकाटे, सिद्धेश पाटील, पोपट नाळे, महिला पोलिस कर्मचारी रचना काळे, आणि स्वाती काजळे आदी जखमी झालेत.