मुंबई : दसरा मेळाव्यामध्ये शिवाजी पार्कवर उद्धव ठाकरे यांनी जोरदार फटकेबाजी केली. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि बंडखोरी केलेल्या आमदारांवरही टीकेचे बाण सोडले. यावेळी बोलताना घुसखोरीवरून उद्धव ठाकरे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शहा यांच्यावरही निशाणा साधला आहे.
गेली आठ वर्षे झाली मोदी म्हणतात, 'पाकिस्तान को उसी की भाषा मे उत्तर देना चाहिए' मग चीनचं सैन्य जेव्हा भारतामध्ये घुसखोरी करतं तेव्हा तुमची ही भाषा कुठं जाते. तिकडे शेपट्या घालायच्या आणि इकडे पंजे दाखवायचे. पाकव्याप्त काश्मीरमधला एक इंचही तुकडा परत घेऊ शकला नाहीत. चीन लेह, लडाखमध्ये घुसतंय. ती जमीन घेऊन दाखवा, आम्ही तुम्हाला डोक्यावर घेऊन नाचू, हे कशाला हवेत गद्दार. गद्दारांच्या पालखीत बसून कशाला मिरवताय?, असं उद्धव ठाकरे म्हणाले.
उद्धव ठाकरेंचं अमित शहांना आव्हान
अमित शहा हे मुंबईत येऊन म्हणतात की, शिवसेनेला जमीन दाखवा. तुम्ही शिवसेनेला जरुर जमीन दाखवा, ही जमीन आमचीच आहे, पण अमित शहा यांनी आम्हाला पाकव्याप्त काश्मीरची जमीन जिंकून दाखवावी, असं आव्हान उद्धव ठाकरेंनी दिलं आहे.
अडीच वर्षाच्या मुख्यमंत्रिपदाबाबत खुलासा
मी शिवरायांच्या साक्षीने आणि माझ्या आईवडिलांची शपथ घेऊन सांगतो की, अमित शहा यांच्यासोबतच्या भेटीत शिवसेना आणि भाजपमध्ये मुख्यमंत्रीपद अडीच-अडीच वर्षे वाटून घेण्याचं ठरलं होतं. मात्र त्यानंतर अमित शहा म्हणाले शक्य नाही. त्यावेळी शक्य नाही म्हणाले मग जे आता केलंत ते तेव्हाच का केलं नाही, असंही उद्धव ठाकरे म्हणाले.