रत्नागिरी : महाराष्ट्रात (Maharashtra) सर्वाधिक डेल्टा प्लस (Delta Plus) या कोरोना विषाणूचे ( coronavirus) रुग्ण रत्नागिरी (Ratnagiri) जिल्ह्याता आढळलेत. आरोग्य मंत्र्यांनी याची माहिती दिल्यानंतर रत्नागिरीतील आरोग्य यंत्रणा अलर्ट झाली आहे. केंद्र सरकारने सुद्धा अशा भागात कन्टेंमेट झोन करण्याचे आदेश दिलेत. त्या अनुशंधाने रत्नागिरी जिल्ह्यातील संगमेश्वरमध्ये डेल्टा प्लसचे विषाणू आढळल्याचं बोललं जात असलेल्या चार गावात आरोग्य यंत्रणेनी विशेष लक्ष्य् केंद्रीत केले आहे.
संगमेश्वरमधील चार गावात कंन्टेंटमेंट झोन केला गेलाय. संगमेश्वरमधील माभळे, कसबा, नावडी-बाजारपेठ आणि धामणी या गावात कडक कंन्टेंटमेंट झोन केला गेलाय. संगमेश्वर तालुक्यात गेल्या दोन आठवड्यात ५०० हून अधिक रुग्ण आढळले होते. डेल्टा प्लस वेरिएंटचे रुग्ण आढळल्याचा संशय व्यक्त होणाऱ्या या चार गावात आरोग्य यंत्रणेकडून इंडेक्स केसेसची संपूर्ण माहिती घेतली जात आहे.
अर्थात त्यांनी केलेला प्रवास, लसीकरण झाले होते का, त्यांना कोरोनाची पुन्हा लागण झाली का, याबाबत माहिती घेऊन त्यांच्या निकट आणि कुटुंबातील सदस्यांची तपासणी केली जात आहे. त्याचबरोबर सारी आणि आयएलआयचे सर्वेक्षण केले जात आहे. डेल्टा आणि डेल्टा प्लसचे जे म्युटेशन झाले आहे त्याबाबत सविस्तर माहिती जमा केली जात आहे. आरोग्य मंत्र्यांनी रत्नागिरीत डेल्टा प्लसचे रुग्ण आढळल्याचे सांगितले. पण रत्नागिरीचे जिल्हा प्रशासन असा कोणताच कोरोनाचे व्हेरिएंट सापडला नसल्याचा दावा करत आहे. त्यामुळे आरोग्य यंत्रणेत ताळमेळ नसल्याचे या निमित्ताने पुढे आले आहे.