धाराशिवमध्ये दोन गटात तुफान राडा! चौघांचा मृत्यू; वादाचं कारण वाचून बसेल धक्का

Dharashiv Crime News Today: धाराशिव जिल्ह्यात एक धक्कादायक घटना समोर येत आहे. दोन गटांत झालेल्या हाणामारीत 4 जणांचा मृत्यू झाला आहे.   

मानसी क्षीरसागर | Updated: Jan 6, 2025, 12:20 PM IST
धाराशिवमध्ये दोन गटात तुफान राडा! चौघांचा मृत्यू; वादाचं कारण वाचून बसेल धक्का title=
Dharashiv Crime News Today Clash between two groups 4 people died

ज्ञानेश्वर पंतगे, झी मीडिया

Dharashiv Crime News Today:  धाराशिव जिल्ह्यात एक धक्कादायक घटना समोर आली आहे. दोन गटांत झालेल्या हाणामारीत चार जणांचा मृत्यू झाल्याचे समोर आले आहे. धाराशिव जिल्ह्यातील कळंब तालुक्यातील ही घटना आहे. या प्रकरणी पोलिसांनी 10 आरोपींना संशयित म्हणून पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. मात्र, या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली आहे. 

धाराशिव जिल्ह्यातील कळंब तालुक्यातील वाशीतील बावी या गावात शेताला पाणी देण्यावरुन वाद झाला होता. मात्र हा वाद इतका विकोपाला गेला की दोन्ही गट हाणामारीवर उतरले की यात 4 जणांचा मृत्यू झाला. यात 3 पुरुष एक महिला मृत्युमुखी पडले आहेत. तर, या घटनेत लहान मुलंदेखील जखमी झाले आहेत. त्यांना वाशीतील प्राथमिक रुग्णालयात दाखल करण्यात आलं असून त्यांच्यावर उपचार करण्यात येत आहेत. 

मध्यरात्रीच्या ही घटना घडली असून शेतात पाणी देण्यावरुन वाद झाल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. या प्रकरणात येरमळा पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला असून 10 आरोपींना संशियत म्हणून पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. मात्र, एका क्षुल्लक कारणावरुन झालेला वाद इतका विकोपाला गेला की 4 जणांना जीव गमवावा लागला. या घटनेनेच परिसरात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. 

नाशिकमध्येही शेतीच्या वादातून मारहाण

कळवण तालुक्यातील ओझर चणकापूर येथे शेतीच्या वादातून दोन गटांमध्ये तुफान हाणामारी झालीये. यामध्ये तीन व्यक्ती गंभीर जखमी झाल्या आहेत. फिर्यादी जयवंत निंबा मोरे आणि त्यांची पत्नी हे शेतातील जनावरांच्या गोठ्यातील शेण काढत होते. यावेळी प्रकाश बारकू खैरनार, ज्योती प्रकाश खैरनार, महेश प्रकाश खैरनार, सागर प्रकाश खैरनार आणि राणी संजय पाटील यांनी जमाव जमवून हल्ला केला. संशयित आरोपींनी लोखंडी गज ,कोयता आणि लाल मसाल्याचा वापर करून जयवंत मोरे यांच्यावर हल्ला चढवला. याप्रकरणी पोलिसात पाच आरोपींविरुद्ध विविध गंभीर कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी पाच आरोपींना अटक करण्यात आली असून पुढील तपास सुरू आहे.