Maharashtra Politics : नव्या वर्षाच्या पहिल्याच दिवशी महायुतीत शिमगा सुरु झालाय, निमित्त ठरलंय ते रत्नागिरी-सिंधुदुर्गची जागा.. शिवसेना-भाजपचा परंपरागत मतदारसंघ असलेल्या रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघात लढण्याची तयारी भाजपनं सुरु केल्याचं समजतंय. सार्वजनिक बांधकाम मंत्री रविंद्र चव्हाणांना भाजप मैदानात उतरवण्याची शक्यता आहे. चव्हाणांना तयारीला लागण्याचे वरिष्ठांनी आदेश दिल्याचंही सुत्रांकडून समजतंय. भाजपच्या या तयारीमुळे शिंदे गट अस्वस्थ झालाय.
शिंदे गटाच्या किरण सामंत यांनी सोशल मीडियावर स्टेटस ठेवत भाजपला इशारा दिलाय. आपल्याला रोखतंय कोण असं स्टेटस ठेवत सामंतांनी इशारा दिला.. किरण सामंत हे पालकमंत्री उदय सामंत यांचे बंधु आहेत आणि याच मतदारसंघातून निवडणूक लढवण्याच इच्छुक आहेत. सुरुवातीला आक्रमक पवित्रा घेणा-या किरण सामंत यांनी नंतर मात्र आपली तलवार म्यान केली आणि घुमजाव केलं. रविंद्र चव्हाणांना उमेदवारी मिळाली तर जोरात प्रचार करणार असं सामंत म्हणाले.
महायुतीतली धुसफूस वरवर पाहता शांत झालेली असली तरी वादाची ठिगणी मात्र यानिमित्तानं पडल्याची चर्चा आहे..एकीकडे जागावाटपावरुन महाविकास आघाडीत धुसफूस सुरु असताना महायुतीतही कोकणातल्या जागेवरुन शिमगा सुरु झालीय. त्यामुळे महायुती आणि महाविकास आघाडी जागावाटपाचा तिढा कसा सोडवतात हे पाहणं महत्त्वाचं आहे..
केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी लोकसभेसाठी देशात 8 ते 10 तर राज्यात दोन जागांची मागणी केलीय. RPI आठवले गटाच्या चिन्हावर निवडणूक लढवणार असल्याचं देखील त्यांनी सांगितलंय. आता एनडीए आघाडीत त्यांच्या वाट्याला किती जागा येतात, हे पाहणं महत्त्वाचं ठरणारेय.
नव्या वर्षात वाचाळविरांना सुबुद्धी यावी असं म्हणत देवेंद्र फडणवीसांनी नाव न घेता राऊतांवर टीका केलीये.. जनतेच्या अपेक्षा याच आमच्या अपेक्षा असतात त्या पूर्ण करण्याची शक्ती आम्हाला मिळुदे असं म्हणत त्यांनी राज्याच्या जनतेला नव्या वर्षाच्या शुभेच्छा दिल्यात.
ठाकरे गटाचे खासदार अरविंद सावंतांसाठी युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे मैदानात उतरणार आहेत. 6 जानेवारीला दक्षिण मुंबईत आदित्य ठाकरेंची सभा होणार आहे. गिरगावमध्ये विभाग क्रमांक 12 च्या वतीने आदित्य ठाकरे यांच्या सभेचं आयोजन करण्यात आलंय. दक्षिण मुंबईत ठाकरे गटाकडून पुन्हा अरविंद सावंत यांची उमेदवारी निश्चित मानली जात असली तर अरविंद सावंत यांना भाजपकडून मोठे आव्हान असणार आहे.