कोकणातलं गायब होणारं गाव तुम्हाला माहितीये का? पाहा काय आहे नेमका प्रकार?

गावपळण म्हणजे अख्खं गाव एकत्रितपणे तीन ते चार दिवस वेशीबाहेर निघून जातं. तीन ते चार दिवस पुरणारं अन्नधान्य, कपडे, भांडी, पाळीव प्राण्यांसह अख्खं गाव वेशीबाहेर पडतं आणि नवीन संसार थाटतं. 

Updated: Nov 19, 2022, 10:39 PM IST
कोकणातलं गायब होणारं गाव तुम्हाला माहितीये का? पाहा काय आहे नेमका प्रकार? title=

उमेश परब, प्रतिनिधी, सिंधुदुर्ग : हे आहे मालवण तालुक्यातील चिंदर गाव.. या गावात सध्या गावपळण साजरी केली जातेय. गावपळण म्हणजे अख्खं गाव एकत्रितपणे तीन ते चार दिवस वेशीबाहेर निघून जातं. तीन ते चार दिवस पुरणारं अन्नधान्य, कपडे, भांडी, पाळीव प्राण्यांसह अख्खं गाव वेशीबाहेर पडतं आणि नवीन संसार थाटतं. 

जुन्या रिवाजाप्रमाणे ग्रामदेवतेला कौल लावल्यानंतर गावपळणीचा दिवस ठरतो आणि अख्खं गाव गायब होतं.. पूर्वीच्या काळात साथीच्या रोगांवर मात करण्यासाठी अशाप्रकारे गावपळण केली जायची असं गावक-यांचं म्हणणं आहे. 

या गावपळणीसाठी वयोवृद्धांसह लहान मुलं, चाकरमानी, माहेरवाशिणी मोठ्या उत्साहानं सहभागी होतात. तीन दिवस, तीन रात्री अख्खा गाव वेशीबाहेर असतो. भजन, कीर्तन, फुगड्यांसारखे सांस्कृतिक आणि मनोरंजनात्मक कार्यक्रम सादर केले जातात. वेशीबाहेर राहुट्यांमध्ये संसार थाटला जातो आणि चुलीवर जेवण केलं जातं.

श्रद्धा आणि अंधश्रद्धेची झालर जरी या गावपळणीवर असली तरी सलोखा निर्माण करणाऱ्या गावपळणीची सर्व जण आतुरतेने वाट पाहत असतात हेही तितकच खरं...