विकास भदाणे, जळगाव : जळगाव जिल्ह्यात यंदा भीषण दुष्काळ असून दुष्काळाचा फटका गिरणा तसंच अंजनी नदी पट्ट्यातील लिंबू बागांना बसला आहे. पाण्याअभावी लिंबू बागा करपू लागल्यानं यंदाच्या वर्षी लिंबूच्या उत्पन्नात मोठी घट आल्याचं शेतकऱ्यांचं म्हणणं आहे.
जळगाव जिल्ह्यातील एरंडोल तसंच भडगाव तालुक्यात मोठया प्रमाणात लिंबूच्या बागा आहेत. उन्हाळ्यात लिंबूला मोठी मागणी असल्यानं दरवर्षी शेतकऱ्यांना उन्हाळ्यात लिंबूचे भरघोस उत्पन्न होतं. गेल्या वर्षी मात्र अत्यल्प पाऊस झाल्यानं नद्या-नाले तसंच विहिरींनी तळ गाठला. यामुळं यंदा निंबूचं अपेक्षित उत्पन्न शेतकऱ्यांना मिळालं नाही. एरंडोल तालुक्यातील तळई तसंच मात्र उत्राण परिसरात देखील पाण्याअभावी लिंबुच्या हिरव्या बागा करपल्या. यामुळं शेतकऱ्यांचं मोठं नुकसान झालं असून दुष्काळाचा फटका शेतकऱ्यांना बसला आहे.
लिंबूची शेती ही शेतकऱ्यांचा आर्थिक कणा मजबूत करणारी समजली जाते. मात्र दुष्काळानं यंदा या शेतकऱ्यांचं खरीप हंगामाचं उत्पन्न हिरावलं तसंच रब्बीच्याही आशेवर नांगर फिरवला. यामुळं शासनाकडून मदतीची अपेक्षा शेतकऱ्यांनी व्यक्त केली आहे.