वाल्मिक जोशी, झी २४ तास, जळगाव : जळगाव जिल्ह्याच्या राजकारणात एकनाथ खडसे आणि गिरीश महाजन यांच्यात जोरदार सुंदोपसुंदी सुरु आहे. बोदवड नगरपंचायतीची निवडणूक नुकतीच पार पडली, बोदवड हे एकनाथ खडसे यांच्या मतदारसंघात येतं. या निवडणुकीत शिवसेना आणि भाजप ही छुपी युती असल्याचं दिसून आलं आहे.
विधानसभा निवडणुकीत शिवसेनेचे आमदार चंद्रकांत पाटील यांनी एकनाथ खडसे यांच्या कन्येला हरवलं होतं, यानंतर भाजप आणि शिवसेनेची या बोदवड निवडणुकीत छुपी युती असल्याची चर्चा होती.
बोदवड नगरपंचायत निवडणुकीत भाजपाची दयनीय अवस्था होती, कधी नव्हे एवढी दयनीय अवस्था भाजपाची होती, तसेच गिरीश महाजन यांनी भाजपला विकलं, अशी टीका एकनाथ खडसे यांनी केली, एवढंच नाही, ''गिरिश महाजन आपल्या पराभवाकडे पाहावे, मग इतरांवर टीका करावी'', असा खरमरीत टोला एकनाथ खडसे यांना लगावला आहे.
गिरीश महाजन यांनीही एकनाथ खडसे यांच्यावर प्रतिहल्ला करण्याची संधी सोडलेली नाही, त्यांनी आमच्याकडे बोट दाखवण्यापेक्षा स्वत:च्या दमावर निवडून यायला हवे होते, असा टोला गिरीश महाजन यांनी राष्ट्रवादीचे नेते एकनाथ खडसे यांना लगावला आहे.
या टीकेला उत्तर देताना एकनाथ खडसे यांनी म्हटलं आहे की, बोदवड नगरपंचायत निवडणुकीत आम्ही आमचा पराभव मान्य केला आहे. राष्ट्रवादीचा पराभव हा अतिशय कमी मतांनी आहे, पण भाजपाची अवस्था एवढी दयनीय आहे की, ती आतापर्यंत कधीच झाली नाही. भाजपाचा या निवडणुकीत पूर्ण धुव्वा उडाला आहे, एक जागा आलीय ती देखील ईश्वर चिठ्ठीने असं एकनाथ खडसे यांनी म्हटलं आहे.