सोलापूर : एरव्ही ग्राहकांच्या डोळ्यात पाणी आणणाऱ्या कांद्यानं यावेळी शेतकऱ्यालाच रडवलं आहे. सोलापूरच्या बापू कवडे नावाच्या शेतकऱ्याकडे एक पावती आहे ज्यामध्ये त्याच्याकडील कांद्याला मिळालेला भाव त्याच्यावरती लिहिला आहे. खरेतर अतिवृष्टी आणि अवकाळी पावसानं शेतकऱ्याचे कसे तीनतेरा वाजवलेत, याचाच पंचनामा म्हणजे ही पावती. बापू कवडे यांनी 24 पोती कांदा विक्रीसाठी कृषी उत्पन्न बाजार समितीत आणला. तब्बल 1 हजार 123 किलो कांद्याला प्रति क्विंटल 100 ते 200 रुपये या दरानं जेमतेम 1 हजार 665 रुपये मिळाले. त्यातून हमाली, तोलाई आणि गाडीभाडे असे 1 हजार 651 रुपये खर्च झाले.
हा सगळा खर्च मिळालेल्या पैशांतुन वगळला असता, बिचाऱ्या शेतकऱ्याच्या हातात फक्त 13 रुपये शिल्लक राहिले. आपल्या शेतात कष्टानं पिकवलेल्या कांद्याचे केवळ 13 रुपये हाती आल्यानं आता शेतकऱ्यांवरती रडण्याची वेळ आली आहे.
स्वाभिमान शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांनी याबाबत जोरदार संताप व्यक्त केला आहे. या 13 रूपयामधून सरकारचे 13वे घालावे का? असा तिखट सवाल राजू शेट्टींनी केला आहे. या प्रकारावर शेतकऱ्यांनी देखील तीव्र नाराजी व्यक्त केली आहे.
अतिवृष्टीमुळं आणि अवकाळी पावसामुळं काढणीला आलेला कांदा जमिनीतच कुजून गेला. हा ओला कांदा कवडीमोल दरानं देखील कुणी विकत घ्यायला तयार नाही. त्यामुळं मेटाकुटीला आलेला दुसरा एक शेतकरी सुमारे 90 पोते कांदा मार्केट यार्डातच सोडून निघून गेला.
अवकाळी पावसामुळे आस्मानी संकटात सापडलेल्या शेतकऱ्याला मातीमोल दरामुळे सुल्तनी संकटालाही सामोरं जावं लागतंय. कांदा उत्पादक शेतकऱ्यांचं हे विदारक चित्र पाहिल्यानंतर शेतकऱ्याच्या नाकालाच कांदा लावण्याची वेळ आली आहे.