सिंधुदुर्गात ईमान इला रे...! 'चिपी'वर उतरलं पहिलं विमान

जिल्ह्यात राजकीय आरोप प्रत्यारोपांचे आणि श्रेयवादाचं धुमशानही रंगलंय

Updated: Sep 12, 2018, 04:53 PM IST
सिंधुदुर्गात ईमान इला रे...! 'चिपी'वर उतरलं पहिलं विमान title=

सिंधुदुर्ग : पर्यटनासाठी नंदनवन मानला जाणाऱ्या सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या शिरपेचात आज मानाचा तुरा रोवला गेला... बहुचर्चित चिपी विमानतळावर पहिली हवाई चाचणी यशस्वीपणे पार पडली. गणेशाची मूर्ती घेऊन विमान सिंधुदुर्गातल्या चिपी विमानतळावर उतरले. 

अधिक वाचा : ...म्हणून सिंधुदुर्गच्या विमानतळाचं नाव 'चिपी' पडलंय!

चेन्नईहून एचडीएल कंपनीच्या खासगी विमानाने उड्डाण केलं आणि गोव्या मार्गे विमान सिंधुदुर्गात दाखल झालं. पहिल्या विमानाने विमानतळावर लॅन्डिंग केल्यावर सिंधुदुर्गवासियांनी टाळ्यांचा कडकडाट करून आणि फटाके फोडून आनंद व्यक्त केला. 

दरम्यान, चिपी विमानतळ हे व्यावसायिक लॅन्डिंगगसाठी उत्तम विमानतळ आहे अशी प्रतिक्रिया इथं उतरलेल्या पहिल्या विमानाच्या वैमानिकाने दिलीय. 

गणेशमूर्तीसह सिंधुदुर्गच्या 'चिपी' विमानतळावर उतरणार पहिलं विमान

त्यानंतर अधिकाऱ्यांनी विमानापाशी जाऊन विमानात ठेवलेली गणेशमूर्ती मोठ्या सन्मानाने बाहेर काढण्यात आली. आणि वाजत गाजत विमानतळावर आणण्यात आली. दीड दिवसांच्या या बाप्पाचं विमानतळावर प्रतिष्ठापना करण्यात येणार आहे. 

जिल्ह्याचे पालकमंत्री आणि गृहराज्यमंत्री दीपक केसरकर, शिवसेना खासदार विनायक राऊत, आमदार वैभव नाईक आणि पक्षाचे पदाधिकारी कार्यकर्ते तसंच सिंधुदुर्गवासीय मोठ्यासंख्येनं विमानतळावर ही हवाई चाचणी पाहण्यासाठी उपस्थित होते. 

विमानातून येणाऱ्या गणपतीच्या मूर्तीचं विमानतळावरच वाजत गाजत स्वागत करण्यात आलं...विमानतळावरच गणरायाची स्थापना करण्यात आली... खरं तर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि हवाई वाहतूक मंत्री सुरेश प्रभू यांच्यासह VVIP विमान लॅन्डिंगची केसरकर यांची संकल्पना होती. पण काही तांत्रिक कारणांमुळे ती पूर्ण होऊ शकली नाही. त्यामुळे प्रवाशांशिवाय झालेल्या विमानाच्या हवाई चाचणीवर त्यांना समाधान मानावं लागलेय.