मुंबई : गिरणी कामगारांच्या संपात लाखो कामगारांची घरे उद्धवस्त झाली. गिरणी कामगाराचा मुलगा असल्यामुळे मी ते जवळून अनुभवले आहे. मी स्वतः या संपामुळे होरपळलो आहे. त्यामुळे एसटीचा संप लवकरात लवकर संपवा, असं आवाहन भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी केलंय.
ST महामंडळाचे राज्य सरकारमध्ये विलीनीकरण करण्याबाबतच्या याचिकेवर आजही न्यायालयात निर्णय झाला नाही. यावेळी राज्य सरकारने अर्थ संकल्पिय अधिवेशन सुरू असल्यानं निर्णय घेण्यात उशिर हॊत असल्याची कबुली दिली.
यावर न्यायालयाने एसटी कर्मचाऱ्यांच्या विलिनीकरणावर अंतिम भूमिका स्पष्ट करण्यासाठी राज्य सरकारला 15 दिवसांची मुदतवाढ दिली. तसेच, 1 एप्रिलपर्यंत प्रतिज्ञापत्र सादर करून 5 एप्रिलला होणाऱ्या पुढील सुनावणीत उत्तर देण्याचे राज्य सरकारला निर्देश दिलेत.
राज्य सरकारच्यावतीने न्यायालयात योग्य बाजू मांडण्यात येत नाही. त्यामुळे दिवसेंदिवस हा तिढा वाढत चालला आहे. एसटी कर्मचारी आपल्या मागण्यांवर ठाम असून ते संप मागे घेण्यास तयार नाहीत. या पार्श्वभूमीवर चंद्रकांत पाटील यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार आणि परिवहन मंत्री अनिल परब यांची भेट घेत या संपावर तोडगा काढण्याची मागणी केली. या भेटीत त्यांनी कर्मचाऱ्यांना 'सातवा वेतन आयोग लागू करण्याचीही मागणी केली.
त्यांनतर पत्रकारांशी बोलताना चंद्रकांत पाटील म्हणाले, माझे वडील मुंबईत गिरणी कामगार होते. आईसुद्धा कापड गिरणीत काम करायची. दत्ता सामंत यांनी पुकारलेल्या गिरणी कामगारांच्या संपात लाखो कामगारांची घरे उध्वस्त झाली ते मी पाहिले आहे.
एसटी संपाची वाटचालही त्याच दिशेने सुरु आहे. हा संप मिटला नाही तर एक लाख संसार उध्वस्त होतील. गेले चार महिने एसटी कर्मचारी रस्त्यावर बसले आहेत. काहीजण निराशेने आत्महत्या करत आहेत आणि सरकार त्याकडे दुर्लक्ष करत आहेत.
एसटीच्या संपामुळे कर्मचाऱ्यांचे, जनतेचेही खूप हाल होत आहेत. तालुक्याच्या ठिकाणी जाण्यासाठी लोकांना नेहेमीपेक्षा जास्त पैसे खर्च करावे लागत आहेत. मुलींना शाळेत आणि कॉलेजमध्ये जाणे अवघड झाले आहे.
एसटी कर्मचाऱ्यांचा पगार तुटपुंजा आहे. जो पगार आहे तो ही वेळेत मिळत नाही. यामुळे त्यांच्यावर संप करण्याची वेळ आलीय. राज्य सरकारच्या कर्मचाऱ्यांप्रमाणे सातवा वेतन आयोग लागू करणे, समान सुविधा देणे आणि वेतनाची हमी देणे असा चांगला प्रस्ताव मांडला तर कर्मचारीही संपाबाबत विचार करतील.
यासाठी अजितदादांनी पुढाकार घेतला पाहिजे. वाटल्यास तुम्ही सगळे श्रेय घ्या, पण एसटीचा संप मिटवा. सरकारने एसटी कर्मचाऱ्यांसमोर चांगला प्रस्ताव मांडला तर ते सुद्धा दोन पावले मागे जातील, असेही चंद्रकांत दादा पाटील यांनी यावेळी सांगितले.