Fraud Alert: मार्च महिना आला की आयकर रिटर्न (Income Tax Return), पॅनकार्ड (Pan Card) म्हणजेच आर्थिक गोष्टींशी संबंधित विषयांची चर्चा सुरु होते. लोकांची होणारी ही धांदल लक्षात घेत अनेक सायबर गुन्हेगार (Cyber Crime) फसवणूक करण्यासाठी दबा धरुन बसलेले असतात. यादरम्यान, मोबाइलवर कॉल आणि मेसेज करत लोकांची फसवणूक केली जाते. सध्या अशाच प्रकारे सायबर चोरांकडून गंडा घातला जात असून, नीट लक्ष दिलं नाही तर तुम्ही त्याला बळी पडू शकता.
लोकांची फसवणूक करण्यासाठी सायबर गुन्हेगार पॅनकार्डची मदत घेत आहे. तुमचं पॅनकार्ड बँक खात्याशी लिंक नसल्याचं सांगत ही फसवणूक केली जात आहे. जर तुम्ही पॅन कार्ड आणि बँक खातं लिंक केलं नाही तर खातं बंद होईल, असं या मेसेजमध्ये सांगितलं जात आहे. यानंतर ॲपच्या माध्यमातून लाखो रुपयांची फसवणूक केली जाते.
मुंबईत आठवडाभरात पॅनकार्ड फसवणुकीचे असे दोन डझनहून अधिक गुन्हे दाखल झाले आहेत. त्यामुळे पोलिसांनी लोकांना सायबर चोरांपासून सावधान राहण्याच्या सूचना दिल्या आहेत.
गोरेगाव पूर्वेकडील ओबेरॉय वुड्स येथे राहणाऱ्या 78 वर्षीय ज्येष्ठ नागरिकाच्या मोबाइलवर मेसेज आला होता. तुमचं पॅनकार्ड बँक खात्याशी लिंक नसल्याने तुमचं नेट बँकिंग ब्लॉक करण्यात येत आहे असं या मेसेजमध्ये लिहिलेलं होतं. या मेसेजसह एक लिंकदेखील पाठविण्यात आली होती. या लिंकवर जाऊन पॅनकार्ड आणि बँक खात्याचा तपशील तुम्ही घरबसल्या अपडेट करु शकता असा उल्लेख या मेसेजमध्ये होता.
हा खोटा मेसेज असल्याची कोणतीही कल्पना नसलेल्या वृद्धाने लिंकवर जाऊन आपल्या तिन्ही बँक खात्यांना पॅनकार्डने जोडण्यास सुरुवात केली. वृद्धाने पहिल्या खात्याची माहिती भरल्यानंतर 99 हजार 998 रुपये काढून घेण्यात आले. दरम्यान, इतर दोन खात्यांना पॅनकार्ड जोडत असताना आणखी 3 लाख रुपये काढून घेण्यात आले. याबाबत आरे पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
प्रिय ग्राहक, तुमचे बँक खाते क्रमांक काही वेळातच बंद करण्यात येणार आहे. आपल्या खात्याला पॅनकार्ड लिंक केलेले नाही. खाते बंद होणे टाळण्यासाठी दिलेल्या लिंकवर क्लिक करा आणि घरबसल्या अपडेट करा.
- चेंबूर येथे एका 62 वर्षीय व्यक्तीच्या खात्यामधून एक लाख परस्पर वळविले.
- चुनाभट्टी : पॅनकार्डसाठी लिंक पाठवून 66 हजार काढले.
- वनराई : खाते बंद होण्याची भीती दाखवून 84 हजार रुपये काढून घेतले.
- मालाड : एचडीएफसी बँकेची लिंक भासवून 99 हजार रुपयांची फसवणूक.
- ट्रॉम्बे : पॅनकार्ड अपडेट करण्याच्या बहाण्याने 99 हजार 999 रुपयांचा गंडा.
- कफ परेड : ऑनलाइन 28 हजार रुपये परस्पर वळविले.
- चेंबूर : बँकेतून बोलत असल्याचे सांगत अपडेटच्या नावाखाली 99 हजार 950 रुपये काढले.
- विक्रोळी : खोटी लिंक पाठवून 99 हजारांची फसवणूक.
- घाटकोपर : पॅनकार्ड अपडेटचा संदेश तरुणाला एक लाखाला पडला.
- अंधेरी : चलाखीने ओटीपी घेऊन बँक खात्यातून एक लाख रुपये काढले.