मुंबई : गणेशगल्लीचा राजा म्हणजेच मुंबईचा राजा... मुंबईतला मानाचा गणपती... गणेशगल्लीच्या राज्याच्या विसर्जन मिरवणुकीनंतरच मुंबईतल्या सर्व गणेश मंडळांची विसर्जन मिरवणूक सुरू होते. आज सकाळी पावणे आठ वाजता गणेशाची आरती करण्यात आली. त्यानंतर सव्वा आठच्या सुमाराला बाप्पा विसर्जन मिरवणुकीला सुरूवात झाली. वाजत गाजत गुलालाची उधळण करत बाप्पा मंडपातून बाहेर पडला. कार्यकर्त्यांनी ढोलताशांचा गजर केला आणि बाप्पा मार्गस्थ झाला.
कोल्हापूरात सार्वजनिक गणेश विसर्जन मिरवणूकीला सुरवात झालीय. गणेश विसर्जन मिरवणूक मार्गावर मानाच्या तुकाराम माळी तालीम मंडळाचा गणपती अग्रभागी आहे.. कोल्हापूरचे पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांच्याहस्ते मानाच्या तुकाराम माळी तालीम मंडळाच्या गणपतीची पुजा करण्यात आली आणि त्यानंतर या मिरवणुकीला सुरुवात झाली... पोलिस बँड, पारंपरिक वाद्यांच्या निनादात आणि ढोल ताश्याच्या गजरात ही मिरवणूक सुरु आहे..दरम्यान कोल्हापूरचे पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील यानी डोल्बी मुक्त गणेश विसर्जन मिरवणूक काढुन कोल्हापूरच्या लौकिकात भर घालावी असं आवाहन केलंय.
पुण्यातही विसर्जन मिरवणुकीचा उत्साह आहे. मानाच्या गणपतींची मिरवणूक थोड्याच वेळात सुरू होत आहे. मिरवणूक मार्गावर कार्यकर्त्यांनी भव्य रांगोळी काढल्या आहेत. सुंदर आकर्षक रांगोळ्यांनी पुण्यातले रस्ते सजलेत.