Gautami Patil in Pandharpur: राज्यात सध्या एक नाव चांगलंच चर्चेत असून प्रत्येकाच्या तोंडी आहे ते म्हणजे गौतमी पाटील (Gautami Patil). राज्यात कुठेही मोठा कार्यक्रम असला तर गौतमी पाटीलला आमंत्रण दिलं जात आहे. गौतमी पाटीलची क्रेझ सध्या इतकी आहे की, वाढदिवस, बारसं या कार्यक्रमांसाठीही तिला बोलवलं जात आहे. तिचं हे वेड फक्त तरुण नाही तर ग्रामीण महिलांमध्येही आहे. याशिवाय तिच्या कार्यक्रमात होणाऱ्या राड्यांमुळेही ती चर्चेत असते. दरम्यान नुकतंच नृत्यांगणा गौतमी पाटील पंढरपुरात पोहोचली होती. यावेळी गौतमीने पाटीलने पंढरपुरच्या विठुरायाचं दर्शन घेतलं. यावेळी तिने वारकऱ्यांची (Warkari) सेवा करण्याची इच्छा व्यक्त केली. तसंच बीडमधील (Beed) एका तरुणाने घातलेल्या लग्नाच्या प्रस्तावावरही भाष्य केलं.
गौतमी पाटील पंढरपुरात एका कार्यक्रमाच्या निमित्ताने असून यावेळी ती विठुरायाच्या दर्शनासाठी मंदिरात पोहोचली होती. गौतमी येणार असल्याने यावेळी मंदिरात चोख बंदोबस्त ठेवण्यात आला होता. दर्शन घेतल्यानंतर गौतमीने प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. यावेळी तिला देवाकडे काय मागितलं? असं विचारलं असता गौतमीने तुझा आशीर्वाद राहू दे अशी प्रार्थना केली असल्याचं सांगितलं.
वारकऱ्यांसाठी एखादा कार्यक्रम करण्याची इच्छा आहे का? असं विचारलं असता गौतमीने सांगितलं की "वारकऱ्यांसाठी एखादा कार्यक्रम करण्याची माझी नक्कीच इच्छा आहे. पण अद्याप तशी काही तयार नाही. आज माझा या भागात कार्यक्रम असल्याने दर्शनासाठी आली होती".
नितेश राणे यांनी संजय राऊत यांना महाविकास आघाडीची गौतमी पाटील असं म्हटल्याबद्दल विचारलं असता गौतमी पाटीलने प्रतिक्रिया देण्यास नकार दिला. मला त्यावर काही बोलायचं नाही सांगत तिने हा प्रश्न टाळला.
बीडच्या गलांडे पाटील या तरुणाने गौतमी पाटीलला जाहीरपणे लग्नाची मागणी घातली आहे. त्याने सोशल मीडियावरुन गौतमी पाटीलला लग्नाची मागणी घातली असून 'तू जशी आहेस, तशी स्वीकारायला मी तयार आहे' असं या तरुणाने म्हटलं आहे. तरुणाच्या लग्नाच्या प्रस्तावावर विचारलं असता गौतमीने सांगितलं की, "अजिबात तसला काही विचार नाही. कोणीही काही म्हटलं तरी मी कशाला त्याकडे लक्ष देऊ".
पाटील आडनावावरुन सुरु असलेल्या वादावर बोलताना तिने आपण आधीच भूमिका स्पष्ट केली आहे सांगत जास्त भाष्य करण्यास नकार दिला. मी सांगितलं असून, पुन्हा पुन्हा तेच बोलणार नाही असं ती म्हणाली.