वाल्मिक जोशी, झी २४ तास, जळगाव : खोदकाम करताना अचानक खजिना सापडला असा सीन तुम्ही एखाद्या सीरिजमध्ये किंवा सिनेमात पाहिला असेल. पण अशी एक घटना चक्क जळगावात घडली आहे. ही घटना वाचून तुमच्या भुवया आश्चर्यानं उंचावतील आणि आई शप्पत असं तोंडातून निघू शकतं. याचं कारण म्हणजे एका जुन्या घरात खोदकाम करताना चक्क सोन्याचांदीचा खजिना सापडला.
खान्देशात एका घरात मोठं घबाड हाती लागलं आहे. तेही साधसुधं नाही बर का? सोन्याचा खजिना सापडला आहे. जळगावच्या एरंडोल तालुक्यातील कासोदा गावात ताराबाई गणपती समदानी यांच्या घरात हा खजिना सापडला. त्यांच्या जुन्या आणि पडक्या घराचे खोदकाम सध्या सुरू आहे.
खोदकामासाठी जेसीबी मागवण्यात आला होता. जेसीबी चालक जितेंद्र यादव, ट्रॅक्टर चालक ज्ञानेश्वर मराठे, संजय साहेबराव पाटील आणि राहुल भिल खोदकाम करत होते. त्यावेळी त्यांना राजा-महाराजांच्या काळातले सोन्याचे दागिने आणि चांदीचे शिक्के सापडले.
हे चांदीचे शिक्के सन 1905 ते 1919 या कालावधीतील आहेत. तर सोन्याचे दागिने राजे-महाराजांच्या काळातील आहेत त्यांची किंमत 20 लाख रुपयांच्या घरात असावी, असा अंदाज आहे. हा खजिना कासोदा पोलीस ठाण्यात जमा करण्यात आला आहे. सध्या जळगाव जिल्ह्यात याच खजिन्याची चर्चा रंगली आहे.
पूर्वीच्या काळी लोक आपल्या घरातच खजिना दडवून ठेवायचे. असे अनेक पुरातन वाडे राज्यात ठिकठिकाणी आहेत. तिथल्या गुप्तधनाच्या लालसेनं अनेकदा जीव घेण्याचे प्रकारही घडलेत. अशावेळी जळगावकरांना मिळालेला हा धक्का सुखदच म्हणायला हवा.