दीपक भातुसे, झी मीडिया, मुंबई : मुंबईसह राज्यभरात कोरोना प्रादुर्भाव वाढल्याने पुन्हा लॉकडाऊन (Lockdown) होणार का ? असा प्रश्न उपस्थित केला जातोय. आरोग्यमंत्री राजेश टोपे (HealthMinister Rajesh Tope) यांनी यासंदर्भात स्पष्टीकरण दिले आहे. लॉकडाऊन लगेच लागेल असं नाही पण मुख्यमंत्र्यांनी अभ्यास करण्यासाठी तशी सूचना दिली. आम्ही दररोज निरीक्षण करतोय असे राजेश टोपे म्हणाले.
लॉकडाऊन हे मुख्यमंत्री, मला आणि कुणालाही मान्य नाही. सध्या ८५ टक्के रुग्ण हे लक्षणे नसलेले आहेत. उरलेले १५ टक्के रुग्णांपैकी काही रुग्ण आयसीयू आणि ऑक्सिजन बेडवर जाण्याचं प्रमाण वाढतंय. त्यामुळे भविष्यात बेड कमी पडू नये याचा अभ्यास करावा लागतो आणि निर्णय घ्यावा लागतो असे ते म्हणाले. तहान लागल्यावर विहिरी खोदायची नसते. आपल्याला तयारी करून ठेवावी लागते. त्यासाठी मुख्यमंत्र्यांनी लॉकडाऊनबाबत सूचना केल्या असे टोपे म्हणाले.
साधारणतः १० ते २० टक्के बेड शिल्लक असतील आणि जास्त रुग्ण वाढण्याची शक्यता असेल. लक्षणे असलेल्या रुग्णांची संख्या वाढू लागली तरच असं पाऊल उचलावं लागतं. परिस्थीती हाताबाहेर जाऊ लागली तरच लॉकडाऊन हा शेवटचा पर्याय असेल असे देखील आरोग्यमंत्री म्हणाले.
हातावर पोट असणारे मजूर यांच्यावर गदा येईल लॉकडाऊनमुळे असं काही होऊ नये अशी भावना आहे. त्यामुळे खाजगी कार्यालयांना पूर्ण वर्क फ्रॉम होमचा पर्याय देऊ शकतो. कदाचित रेस्टॉरंट, सिनेमागृहे शंभर टक्के बंद करू शकतो असे संकेत देखील त्यांनी यावेळी दिले.
लॉकडाऊनपेक्षा असे निर्बंध वाढवले जाण्याची शक्यता जास्त आहे. उपलब्ध बेडची संख्या आणि वाढणार्या रुग्णांची संख्या यात खूप तफावत असेल तर मात्र आम्हाला लॉकडाऊनचे पाऊल उचलावे लागेल असे ते म्हणाले.
दुसर्या लाटेत प्रसार करण्याचं प्रमाण जास्त आहे. पण लक्षणे नसलेले रुग्ण ८५ टक्के आहेत. खोटे रिपोर्ट देण्याचं कुठे जाणीवपूर्वक केलं जात असेल तर कठोर कारवाई केली जाईल असा इशाराही त्यांनी दिला.
लसीकरणाचे काही नियम पाळावेच लागतात. २ ते ८ डिग्रीच्या तापमानात लस ठेवावी लागते.त्यापेक्षा जास्त तापमानात लस ठेवली तर परिणामकारकता कमी होते. त्यामुळे जिथे कोल्ड स्टोरेज चैन आहे त्याची खात्री करूनच सेंटरला परवानगी दिली जाते. लसीकरणाचे प्रशिक्षण दिलं आहे. कुठल्याही परिस्थितीत प्रशिक्षण नसलेल्या लोकांच्या हातात लसीकरणाचा कार्यक्रम देणार नाही असेही ते म्हणाले.