मुंबई : वसई-विरारमध्ये सकाळपासून मुसळधार पाऊस सुरु असून पावसाचा फटका जनावरांनाही बसलाय. विरार पूर्वेच्या फुलपाडा इथल्या नाल्यात उतरलेल्या पाच म्हशींपैकी तीन म्हशी वाहून गेल्या.
म्हशी वाहून जातानाचा लाईव्ह व्हिडीओ कॅमेऱ्यात कैद झाला आहे. याबाबतची माहिती मिळताच वसई महापालिकेच्या अग्निशमन पथकाच्या जवानांनी रेस्क्यू ऑपरेशन सुरू केलं. एक म्हैस आणि तिच्या रेडकूला वाचविण्यात यश आलंय.
राज्यात मुसळधार पावसाचा इशारा हवामान विभागाने दिला आहे. मुंबई आणि ठाण्यात तीन दिवस मुसळधार पावसाची शक्यता असून हवामान विभागाने सतर्कतेचा इशारा दिला आहे. मुंबई आणि उपनगरांमध्ये आज सकाळपासूनच पावसाचा जोर पाहिला मिळतोय.
राज्यात सर्वदूर मान्सूनची बरसात होतेय. विदर्भातही पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे बुलढाणा जिल्ह्यात काल संध्याकाळी मुसळधार पाऊस झाला. त्यामुळे नदी नाले दुथडी भरून वाहू लागलेत. तर मराठवाड्यातही पावसाने जोर पकडलाय. कोकण आणि पाऊस हे जुनं नातं आहे. रत्नागिरी जिल्ह्यात राजापूर तालुक्यात सकाळपासून मुसळधार पाऊस सुरू आहे. अर्जुना आणि कोदवली नदयांना पूर आलाय. तर चिपळूण, गुहागर तालुक्यामध्येही मुसळधार पावसामुळे सखल भागांमध्ये पाणी शिरलंय.