मालवणातील राजकोट, सर्जेकोटमध्ये फरक काय? शिवरायांचा पुतळा कोणत्या किल्ल्यावर होता? गोंधळण्याआधी फरक पाहा...

Chhatrapati Shivaji Maharaj Statue Collapse : राष्ट्रीय नौदल दिनाच्या निमित्तानं महाराष्ट्रातील राजकोट किल्ल्यावर छत्रपती शिवाजी महाराजांच्या पूर्णाकृती पुतळ्याचं अनावरण करण्यात आलं.   

सायली पाटील | Updated: Aug 30, 2024, 10:09 AM IST
मालवणातील राजकोट, सर्जेकोटमध्ये फरक काय? शिवरायांचा पुतळा कोणत्या किल्ल्यावर होता? गोंधळण्याआधी फरक पाहा... title=
Importance and significance of fort rajkot sarjekot malvan sindhudurg Chhatrapati Shivaji Maharaj Statue Collapse

Chhatrapati Shivaji Maharaj Statue Collapse : छत्रपती शिवाजी महाराज यांचा (Rajkot fort) राजकोट किल्ल्यावर असणारा पुतळा काही दिवसांपूर्वीच कोसळला आणि एकच खळबळ माजली. पुतळा का आणि कसा कोसळला इथपासून आता त्यातील अनेक तांत्रिक बाबींसह भ्रष्टाचाराचे धागेदोरे जोडले गेल्याचा आरोप विरोधकांनी सत्ताधाऱ्यांवर केला आहे. या संपूर्ण चित्रामध्ये राजकोट आणि सर्जेकोट ही दोन नावं सातत्यानं समोर येत आहेत. काहींकडून पुतळा सर्जेकोटवर असल्याचाही उल्लेख होत आहे. पण, मग हा एकच किल्ला आहे की दोन? या दोन्ही किल्ल्यांचं वेगळेपण काय? जाणून घेऊया... 

राजकोट 

महाराष्ट्राच्या सागरी सीमा भक्कम करण्याच्या हेतूनं छत्रपती शिवाजी महाराजांनी अनेक सागरी किल्ले बांधले. किल्ल्यांच्या या यादीतल सिंधुदुर्ग किल्ल्याचाही समावेश झाला. याच किल्ल्याच्या रक्षणासाठी महाराजांनी आणखी उपकिल्लेही उभारले. पद्मगड, राजकोट, सर्जेकोट अशी त्यांची नावं. मालवणच्या उत्तरेकडे किनाऱ्यावर असणाऱ्या खडकाळ भागात राजकोट उभारण्यात आला. 

साधारण इसवी सन 1664 ते 1667 दरम्यान राजकोटची बांधणी झाल्याचं म्हटलं जातं. सिंधुदुर्गावर जमिनीवरून कोणी हल्ला केल्यास रक्षण करण्याची जबाबदारी राजकोट किल्ल्याचीच. ऐतिहासिक नोंदीनुसार 1766 मध्ये इंग्रज आणि करवीरकरांमध्ये झालेल्या तहानुसार या किल्ल्यावर इंग्रजांनी वखारींसह मोठ्या जहाजांना उभं करण्यासाठीची परवानगी मागितली होती. सध्या तीन बाजुंनी सागरी वेळा आणि एका बाजुला जमीन अशा रचनेत असणाऱ्या या किल्ल्यावर एक बुरूज वगळता फारसे अवशेष अस्तित्वात नाहीत. पण, 1862 मध्ये किल्ल्यातील अवशेष, तुटलेली तटबंदी आणि एक तोफ असल्याचा उल्लेख मात्र आढळतो. 

सर्जेकोट 

सर्जेकोट किल्ला (Sarjekot Fort) कोळंबखाडीच्या मुखावर बांधण्यात आला. हा किल्लासुद्धा सिंधुदुर्गाचं रक्षण करण्यासाठी उभारण्यात आलेल्या उपदुर्गांपैकी एक. या किल्ल्याचं वैशिष्ट्य म्हणजे, वेड्यावाकड्या वळणांच्या या खाडीत पावसाच्या दिवसांमध्ये महाराजांच्या आरमारात असणारी जहाजं इथं नांगरून ठेवली जात. 

ऐतिहासिक नोंदीनुसार 1668 मध्ये हा किल्ला बांधण्यात आला होता. या गडाचं लहानसं पण, कमानदार प्रवेशद्वार, एक बुरूज आणि कडेनं चालत गेल्यास दिसणारा बालेकिल्ला ही पाहण्याची छिकाणं. किल्लातील बालेकिल्ल्याचे बुरूज आणि तटबंती आजही अस्तित्वात असून, प्रवेशद्वार बहुतांशी नाहीसं झालं आहे. बालेकिल्ल्यावर लहानमोठी झुडूपं असल्यामुळं अनेक अवशेष झाकोळले गेले आहेत. 

राजकोट आणि सर्जेकोटला पोहोचायचं कसं? 

मालवण एसटी स्टँडवरून जाणाऱ्या सर्व बस ज्या मार्गानं जातात त्या मार्गावर वडाच्या पारावर उतरून पायी जात 10 मिनिटावर राजकोटला पोहोचता येतं. मालवण जेट्टीवरून किनाऱ्यानंच उत्तरेला चालत गेल्यास राजकोट गाठता येतो. 

सर्जेकोटला पोहोचायचं झाल्यास एसटीनं इथं सहज जाता येतं. मालवणहून रिक्षा केल्यासही तुम्ही या किल्ल्यापाशी पोहोचू शकता. हे अंतर साधारण 4 किमी इतरं आहे. या दोन्ही किल्ल्यांवर तुम्ही खासगी वाहनानंही पोहोचू शकता. एका दिवसात तुम्ही ही दोन्ही ठिकाणं पाहू शकता. दरम्यान इथं राहण्याची किंवा जेवणाची कोणतीही सोय नाही.