प्रशांत शर्मा, झी मीडिया, संगमनेर : इंदूरीकर महाराजांचं किर्तनावर लोकांचा उड्या पडतात. याच इंदूरीकर महाराजांच्या किर्तनाची जादू आगामी विधानसभा निवडणुकीत चालण्याची शक्यता आहे. काँग्रेस प्रदेशाध्यक्षाला स्वतःच्या मतदारसंघात अडकवण्याचा नांदेड पॅटर्न भाजप संगमनेरमध्ये राबवण्याची शक्यता आहे. काँग्रेस प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरातांविरोधात इंदूरीकर महाराजांनाच रिंगणात उतरवण्याची खेळी भाजप खेळू शकते. असं झालं तर थोरातांना संगमनेरबाहेर पडू द्यायचं नाही अशी भाजपची व्युहरचना असू शकते.
महाजनादेश यात्रेवेळी मुख्य़मंत्री देवेंद्र फडणवीसांच्या व्यासपीठावर इंदूरीकर महाराज आले होते. इंदूरीकरांना मुख्यमंत्र्यांनी कडकडून मिठी मारली. याचवेळी इंदूरीकर महाराजांची राधाकृष्ण विखे पाटलांशी नजरानजर झाली आणि दोघंही समजायचं ते समजले. विखेंनी महाराजांचा हात हातात घेतला तेव्हा विखे महाराजांना थोरांतांविरोधात उभं करतात की काय अशी चर्चा उपस्थितांमध्ये सुरु झाली.
बाळासाहेब थोरातांविरोधात इंदूरीकर महाराजांसारखा तगडा उमेदवार भाजपाला शोधून सापडणार नाही. ज्यावेळी इंदूरीकर महाराज व्यासपीठावर गेले त्याचवेळी भाजपचा उमेदवार ठरला की काय अशी चर्चा सुरु झाली. पण इंदूरीकर महाराजांनी मात्र पूरग्रस्तांना मदत देण्यासाठी मुख्यमंत्र्यांच्या व्यासपीठावर गेल्याचं सांगितलं. शिवाय भाजपप्रवेशाच्या शक्यता देखील त्यांनी नाकारला नाही. अर्थात राजकारणात पहिला नकार म्हणजे नंतरच्या होकाराची नांदीच समजली जाते.
अजून निवडणूक जाहीर व्हायला थो़डा अवधी आहे. हा वेळ कुणाचं मन वळवण्यासाठी पुरेसा आहे. त्यामुळं येत्या काही दिवसात इंदूरीकर महाराजांचं संगमनेर मतदारसंघात प्रचाराचं किर्तन पाहण्याची शक्यता नाकारता येत नाही.