मुंबई : 19 फेब्रुवारी २०२२ रोजी शिवाजी पार्क येथे भव्य दिव्य प्रमाणात आणि मोठ्या दिमाखात पहिल्यांदाच शिवजयंती साजरी होणार आहे. आमदार विनायक मेटे यांच्या शिवसंग्राम पक्षाच्यावतीने या शिवजयंतीचे आयोजन करण्यात आलं आहे.
शिव जन्मोत्सवानिमित्त विविध शोभा यात्रा काढण्यात येणार आहेत. या शोभा यात्रेत वेगवेगळ्या प्रकारचे रथ आहेत. यातून शिवाजी महाराज यांचा राज्याभिषेक आणि त्यांच्या जीवनावर आधारित इतर देखावे असणार आहेत.
दांडपट्टा, तलवारबाजी, नृत्य, ढोल पथक, वारकरी, वेगवेगळे लोकनृत्य याचे सादरीकरण शिवाजीपार्क येथे करण्यात येणार आहे. 350 हुन अधिक कलाकार या सोहळ्यात सामील होणार आहेत. ही शोभायात्रा पाचगार्डन येथून सुरू होणार असून शिवाजीपार्क येथे येणार आहे अशी माहिती आ. विनायक मेटे यांनी दिली.
शिव जन्मोत्सवानिमित्त निघणाऱ्या या शोभायात्रेत बहुचर्चित असलेल्या अरबी समुद्रातील छत्रपती शिवाजी महाराज स्मारकाची प्रतिकृती, गड किल्यांची प्रतिकृती असणार आहे. जन्मापासून ते राज्याभिषेकपर्यतची प्रत्यक्ष कलाकृती मंचावर सादर केली जाणार आहे, असे मेटे म्हणाले.