केंद्रीय मंत्र्यांचा सेक्युरिटी ऑफिसर असल्याचं सांगून एका ठगबाजानं सराफा व्यापा-यांना गंडवलं आहे. नागपुरातील दोन सराफा व्यापा-यांना 7 लाखापेक्षा अधिक रुपयांनी गंडवल्यानं नागपुरात खळबळ उडाली आहे.
-- मंत्र्यांच्या नावे सराफांना गंडा
- नागपुरात लुटमारीचा नवा फंडा
- दोन सराफांची लाखोंची फसवणूक
एखाद्या विभागातील मोठा अधिकारी सांगून नोकरी लावण्याच्या बहाण्यानं फसवणूक झाल्याचं आपण नेहमीच ऐकतो. मात्र, केंद्रीय मंत्र्यांचा सेक्युरिटी ऑफिसर असल्याचं सांगून सराफांनाच गंडवल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. नागपूर शहरातील दोन सराफा व्यापा-यांना केंद्रीय मंत्र्यांचा सेक्युरिटी ऑफिसर असल्याचं सांगत या ठगबाजानं 7 लाख 50 हजारांचा गंडा घातला आहे.
या तोतया अधिका-यानं नागपुरातील रोकडे ज्वेलर्समध्ये फसवणूक करण्याचा प्रयत्न केला आहे. ज्वेलर्सच्या मालकांनी लगेच केंद्रीय मंत्र्यांच्या अधिका-यांशी संपर्क करत चौकशी केली. सदर व्यक्ती हा तोतया असल्याचं लक्षात आलं आहे. मात्र, आपलं बिंग फुटल्याचं ठगबाजाच्या लक्षात आल्यानं या तोतया अधिका-यांनं पळ काढला आहे.
दोन सराफा व्यापा-यांना गंडविल्यानंतर मात्र, एका सराफा व्यापा-याला शंका आली आणि 7 ते 8 सराफ ठगबाजाकडून होत असलेल्या फसवणुकीत बचावले आहेत. सराफा व्यापा-यांच्या तक्रारीवरून या तोतया अधिका-याविरुद्ध सीताबर्डी आणि अंबाझरी पोलीस ठाण्यात फसवणुकीचे गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. केंद्रीय मंत्र्यांचा सेक्युरिटी ऑफिसर असल्याचं सांगून सराफा व्यापा-यांना गंडा घालणा-या अशा ठगबाजांपासून सावध राहण्याचं आवाहन करण्यात येत आहे.