Jitendra Awhad Slams Ajit Pawar Over Comment On Sharad Pawar: शरद पवार गटाचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी राज्याचे उपमुख्यमंत्री तसेच शरद पवार यांचे पुतणे अजित पवारांवर निशाणा साधला आहे. कठोर शब्दांमध्ये अजित पवारांनी दिलेल्या प्रतिक्रियेसंदर्भात बोलताना आव्हाड यांनी कठोर शब्दांमध्ये टीका केली आहे. 'काही लोकांना 'ध' चा 'मा' करायची सवयच असते, अशा नाटकीबाज लोकांना मी महत्त्व देत नाही,' असं म्हणत अजित पवार यांनी अप्रत्यक्षपणे जितेंद्र आव्हाडांवर निशाणा साधल्यानंतर आता आव्हाड यांनी त्यांना उत्तर दिलं आहे.
बारामती दौऱ्यात राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावर अजित पवारांनी टीका केलेली. 'माझी शेवटची निवडणूक आहे, असं सांगितलं जाऊन भावनिक केलं जाईल, पण कधी शेवटची असणार काय माहित?' असा टोला अजित पवार (Ajit Pawar) यांनी लगावला होता. त्यावर अनेकांनी टीका केली. आमदार जितेंद्र आव्हाड (Jitendra Awhad) यांनी वक्तव्यावर आक्षेप नोंदवत सडकून टीका केली होती. त्यावर आता अजित पवार यांनी उत्तर देत आव्हाड यांच्यावर निशाणा साधला.
आव्हाड यांनी अजित पवारांच्या या विधानावरुन कठोर शब्दांमध्ये टीका करताना उपमुख्यमंत्र्यांना खडे बोल सुनावले होते. "एखाद्या व्यक्तीच्या मृत्यूची वाट बघणं, याचना करणं कितपत योग्य आहे? आपल्या चुलत्यांच्या मृत्यूची वाट पाहणं हे काय राजकारण आहे का? अजितदादा... असा सवाल जितेंद्र आव्हाड यांनी विचारला होता. बारामतीकर अशा माणसाला त्याची जागा दाखवतील. आधी आपली उंची बघावी आणि शरद पवार कुठे आहेत अन् तुम्ही कुठंय ते पाहावं. लाज वाटते मला तुमच्या सोबत काम केल्याची," असं म्हणत आव्हाड यांनी आपला संताप व्यक्त केला होता.
आव्हाड यांनी केलेल्या टीकेला अजित पवार यांनी एक्स अकाऊंटवरुन उत्तर देताना स्पष्टीकरण दिलेलं. "काल माझ्या म्हणण्याचा चुकीचा अर्थ काढला गेला आहे. माझं पहिल्यापासून, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष एकत्र असल्यापासून एवढंच म्हणणं होतं की, ज्येष्ठ नेत्यांनी शारीरिक दगदगीचा विचार करावा आणि प्रकृतीची काळजी घ्यावी. हे मत मी पूर्वी देखील मांडलेलं आहे. मात्र काही लोक स्वतःच्या राजकारणासाठी ज्येष्ठ नेत्यांचा वापर करू पाहतात. त्यांना ह्या गोष्टी कळणार नाहीत. माझ्या त्यांच्याबद्दलच्या भावना मी वेळोवेळी मांडलेल्या आहेत. पण काही लोकांना 'ध' चा 'मा' करायची सवयच असते, अशा नाटकीबाज लोकांना मी महत्त्व देत नाही. मात्र सर्वसामान्य लोकांना माझ्या भावना कळाव्यात, म्हणून मी हे म्हणणं मांडत आहे," असं अजित पवार म्हणाले.
काल माझ्या म्हणण्याचा चुकीचा अर्थ काढला गेला आहे. माझं पहिल्यापासून, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष एकत्र असल्यापासून एवढंच म्हणणं होतं की, ज्येष्ठ नेत्यांनी शारीरिक दगदगीचा विचार करावा आणि प्रकृतीची काळजी घ्यावी. हे मत मी पूर्वी देखील मांडलेलं आहे. मात्र काही लोक स्वतःच्या…
— Ajit Pawar (@AjitPawarSpeaks) February 5, 2024
अजित पवारांनी केलेली ही पोस्ट कोट करुन रिशेअर करताना आव्हाड यांनी अजित पवारांना सुनावलं. "नाटकी लोकांना किंमत देत नाही तर खुलासा कशाला करता आहात. साहेबांच्या नावाचा फायदा तुम्हाला किती झाला हा प्रश्न स्वतःच्या मनाला विचारा. तुमच्या मनातले तोंडात आले आणि महाराष्ट्राला सत्य कळले. जाऊ द्या, कधी तरी खरा चेहरा बाहेर येतोच. नाहीतर तुम्ही इतकी सारवासारव केली नसती आणि हो कावळ्याच्या शापानी गाय मरत नसते," असा टोला आव्हाड यांनी अजित पवारांना लगावला.
नाटकी लोकांना किमत देत नाही तर खुलासा कश्याला करता आहात.
साहेबांच्या नावाचा फायदा तुम्हाला किती झाला हा प्रश्न स्वतःच्या मनाला विचारा
तुमच्या मनातले तोंडात आले आणि महाराष्ट्राला सत्य कळले
जाऊ द्या कधी तरी खरा चेहरा बाहेर येतोच
नाहीतर तुम्ही इतकी सारवासारव केली नसती
आणि हो… https://t.co/jdukapOz5L— Dr.Jitendra Awhad (@Awhadspeaks) February 5, 2024
अजित पवार यांनी बारामती दौऱ्यात केलेल्या वक्तव्यावर अनेकांनी नाराजी व्यक्त केली होती. काँग्रेसने देखील अजित पवार यांच्यावर टीका करण्याची संधी सोडली नाही. काकांच्या भरोशावर जे मोठे झाले त्यांनी काकाला शिव्या घालत असतील तर तो त्यांचा प्रश्न आहे, असं नाना पटोले यांनी म्हटलं होतं.