"ज्यांनी सुरुवात केली त्यांनीच शेवट केला, हेच सत्य", कपिल पाटील यांनी उद्धव ठाकरेंना सुनावलं!

माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंच्या श्रेय लाटण्याचा आरोपाला कपिल पाटील यांचं प्रत्युत्तर! 

Updated: Dec 11, 2022, 08:05 PM IST
"ज्यांनी सुरुवात केली त्यांनीच शेवट केला, हेच सत्य", कपिल पाटील यांनी उद्धव ठाकरेंना सुनावलं! title=

Kapil Patil on Uddhav Thackeray : महाराष्ट्रासाठी आजचा दिवस ऐतिहासिक ठरला. देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते आज समृद्धी महामार्गाचं लोकार्पण करण्यात आलं. राजकीय वर्तुळात आता समृद्धी मार्गाच्या श्रेयवादावरून टीका होताना दिसत आहे. माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी श्रेय लाटण्याचा आरोप केला. ठाकरेंच्या या आरोपाला केंद्रीय राज्य मंत्री कपिल यांनी प्रत्युत्तर दिलं आहे. रोटरी क्लब ऑफ न्यू कल्याणच्या वतीने आयोजित बीज या पर्यावरण विषयक चर्चासत्राचे उद्घाटन केंद्रीय मंत्र्याच्या हस्ते करण्यात आले यावेळी ते बोलत होते.

समृद्धी महामार्गाची संकल्पना देवेंद्र फडणवीस यांचीच होती. तत्कालीन नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांना ती पूर्ण करण्याची जबाबदारी दिली होती आणि फडणवीस यांनी दिलेली जबाबदारी पूर्ण करत आपण त्यांचा विश्वास संपादन केला अशा शब्दात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत. श्रेय लाटण्याचा प्रश्न नसून ज्यांनी सुरुवात केली त्यांनीच शेवट केला आणि हीच गोष्ट सत्य असल्याचं कपिल पाटील यांनी म्हटलं आहे. यावेळी बोलताना आदर्श गाव योजनेवरही कपिल पाटील यांनी भाष्य केलं. 

ठाणे जिल्ह्याचा एक भाग टोकाचा विकास झालेला तर दुसरा भाग टोकाचा अविकसित आहे. हे अंतर कमी करण्याचे उद्दिष्ट ठेवत केंद्र सरकारच्या आदिवासी विभागाकडून आदी आदर्श गाव योजना राबविण्यात येणार आहे. तेव्हा खऱ्या अर्थाने ठाणे जिल्ह्याचा विकास झाला असं बोलता येईल आणि मला विश्वास आहे हे अंतर कमी करून पूर्ण ठाणे जिल्हा विकासाच्या दृष्टीने अग्रेसर आहे असे आपल्याला बोलता येईल, असं पाटील म्हणाले. जिल्ह्यातील 121 गावे दोन टप्प्यात ही गावे आदर्श करायची आहेत मात्र सामाजिक संस्थांच्या माध्यमातून मदत झाली तर पहिल्याच टप्प्यात ही गावे आदर्श करू असंही त्यांनी सांगितलं.

दरम्यान, चंद्रकांत पाटील यांच्यावर झालेल्या शाई फेक घटनेवरही पाटील यांनी आपली प्रतिक्रिया दिली. एखाद्याने घडलेल्या चुकी बद्दल दिलगिरी व्यक्त करत चूक मान्य केली तर अशा प्रकारची कृती होण योग्य नाही. अशा प्रकारच्या गोष्टी घडू नये आणि दिलगिरी व्यक्त केली तर कुठेतरी थांबले पाहिजे असं पाटील म्हणाले.