Kasba Bypoll Election Result 2023 : गेल्या महिन्याभरापासून चर्चेत असलेल्या कसबा पोटनिवडणुकीचा (Kasba Bypoll Election) निकाल अखेर जाहीर झाला आहे. संपूर्ण महाराष्ट्राचे या निवडणुकीकडे लक्ष लागले होते. महाविकास आघाडीचे उमेदवार रवींद्र धंगेकर (ravindra dhangekar) यांचा मोठ्या फरकारने विजय झाला आहे. रवींद्र धंगेकर यांनी भाजपच्या हेमंत रासने यांचा पराभव केला आहे. तब्बल 28 वर्षांनंतर कसब्यात भाजपने ही जागा गमावली आहे. दिवंगत आमदार मुक्ता टिळक यांच्या निधनाने कसबा पेठ मतदारसंघाची जागा रिक्त झाली होती. त्यानंतर या ठिकाणी पोटनिवडणुक जाहीर करण्यात आली होती. भाजपसाठी ही निवडणूक प्रतिष्ठेची मानली जात होती. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांनी रासने यांच्या प्रचारासाठी रोड शो देखील केला होता. यावरुन आता अजित पवार (Ajit Pawar) यांनी मुख्यमंत्र्यांना टोला लगावला आहे.
"महाराष्ट्रात जे काही सुरू आहे ते जनतेला मान्य नाही. कसब्यामध्ये आमचा विजय झाला आहे. रवींद्र धांगेकर यांना उमेदवारी देऊन आम्ही अर्धी लढाई जिंकलो होतो. तळागाळात काम करणारा कार्यकर्ता. ते दौंड तालुक्यातील पण मागील 20 वर्ष पुण्यात राहात आहेत. आम्ही सर्व मित्र पक्षांची एकजूट बांधण्यात यशस्वी ठरलो. मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, अनेक मंत्री तिथे होते. सर्व गोष्टींचा वापर सत्ताधाऱ्यांनी तिथे केला. तेथील मतदाराने सुद्धा सांगितले की तिथे काय परिस्थिती होती. पण जनतेने आम्हाला कौल दिला," असे अजित पवार म्हणाले.
"हा शिंदे फडणवीस नेतृत्वाचा 100 टक्के पराभव आहे. त्या दोघांनी तिथे बस्तान टाकलेलं होतं आणि तेच दोघे तिथे ठासून बसले होते. राज्याचे मुख्यमंत्री कधी रोड शो घेतात का? यावरुन त्यांनी मला ऐकवलं की, मी सामान्यांचा मुख्यमंत्री आहे आणि सर्वसामान्यांना भेटणार. पण सर्वसामान्यांना भेटून पण सर्वसामान्यांनी पराभव केला. आता हे लक्षात घ्या," असा टोला अजित पवार यांनी लगावला.