प्रताप नाईक / कोल्हापूर : आता एक गोष्ट आजीबाईची. (Grandmother) लहानपणी प्रत्येकाने लेकीकडे भोपळ्यातून जाणारी आजीबाईची गोष्ट ऐकली आहे. कदाचित त्याकाळी दळणवळणाच्या कोणत्याही सुविधा न्हवत्या. त्याचबरोबर वन्य प्राण्यापासून स्वत:ला वाचविण्यासाठी ती आजीबाई 'चल रे भोपळ्या टुनुक टुनुक' असं म्हणत लेकीचं घर गाठत होती. पण आता 21 व्या शतकात दळणवळणाच्या सर्व सोयी सुविधा असताना देखील एखादी 69 वर्षीय आजीबाई (Grandmother) काट्याकुट्यातून वाट तुडवीत आणि डोंगर कपारीतून चालत जाते, अस जर कोणी सांगितले तर तुमचा विश्वास बसणार नाही. पण हे खरं आहे.
कोल्हापूर जिल्ह्यातील महागोंडची रंगुबाई पाटील (Rangubai Patil) ही आजी (Grandmother) कुठेही जाताना चालतच जाते. हो चालतच. आजरा तालुक्यातील महागोंड गावची रंगुबाई आनंदा पाटील आजी कोण असा प्रश्न पंचक्रोशीत कोणाला विचारला तर अनेक जण सहज या आजीबाईला ओळखतात. कारण कुठल्याही गावाला ही आजीबाई चालत जाते. हे आता नाही तर जेव्हापासून चालायला लागली तेव्हापासून. पूर्वी बैलगाडी, त्यानंतर एसटी. आता इतर अत्याधुनिक वाहाने आली. पण ही आजीबाई एकदाही कोणत्याच वाहनात बसलेली नाही. कारण या आजीबाईला या वाहांनाची चांगलीच भीती वाटते. इतकच नाही तर वाघाला बांधीन पण एसटीमध्ये बसणार नाही, असं आजीबाई सांगते.
याबाबत रंगुबाई आनंदा पाटील सांगतात, मी उपजल्यापासून माझं असचं आहे. आम्ही यल्लमाला गेलाव. माज्या भावाने लांब लांबची बायका केल्या, तर मला आदली दिवशी लावून दिल खर न्यायचं बी थाबाय नाही. परत इकडे बी कधी लेकीकडे जायच असेल तर मी चालतच जाते. उत्तरला जायचे असेल तर चालतच. आदली दिशी जाईन पण चालतच जाईन. मला भित्तिच वाटती नुसती. वाघाला भीत नाही पण एस टी ला भितो. तसच बाकीच काय नाही.
वाघाला बांधीन पण बस मध्ये बसणार नाही असा अजब निर्धार रंगुबाई आनंदा पाटील यांनी केला आहे. लेकीकडे जायच असेल तर रंगुबाई सकाळी लवकर तयारी करते डोक्यावर बोचक मारते, आणि थेट पायी चालायला लागते. भावाकडे जायच असेल तर भाऊ रंगुबाईला दोन दिवस आधी निरोप देतो. मग रंगुबाई आदल्या दिवशी चालत निघते. एकाद्या गावाला जाण्यासाठी दोन दिवस लागणार असतील तर आजी आदल्या दिवशी निघते संध्याकाळी एखाद्या ओळखीच्या पाहुण्यांच्या घरी वस्ती करते आणि पुन्हा पहाटे भावाच्या गावाकडे पायी निघते.
आजीच्या पतीचे निधन झालं आहे. मुलाचा आणि लेकीचा संसार चांगला सुरू आहे. भाऊ मान सन्मान देतो. तरी देखील महागोंडमधल्या 10 बाय 12च्या खोलीत विना लाईटच आजी आपल्या शेळ्यासोबत सुखाने राहाते. कारण तिला कोणावर बोज व्हायला आवडत नाही. आता या आजीचे थोडे पाय थकलेत. तरी देखील या आजीची पायपीट मात्र सुरू आहे. कारण या अजीचा जीवन जगण्याचा एकच मंत्र आहे, तो म्हणजे चालत राहा आणि फक्त चालत राहा.