Konkan Railway : कोकणात फक्त सुट्ट्यांच्या मोसमात किंवा सणासुदीच्याच दिवसांसाठी प्रवाशांची, पर्यटकांची आणि चाकरमान्यांची गर्दी होते हे खरं असलं तरीही वर्षभरात या दिशेनं अनेकांचेच पाय वळतात. रस्ते मार्गानं लांबणारा प्रवास वगळून अनेकांचीच पसंती असते ती म्हणजे कोकण रेल्वेला.
किमान खर्च, किमान वेळ आणि आरामदायी प्रवास अशा समीकरणामुळं कोकण रेल्वेला अनेकांचीच पसंती असते. अशा या प्रवासादरम्यान काहीसा खोळंबा होण्याची शक्यता आहे आणि यामागचं कारण आहे ते म्हणजे रेल्वे प्रशासनानं घेतलेला एक निर्णय.
उपलब्ध माहितीनुसार मंगळवारी कोकण रेल्वे उशिराने धावणार आहे. ओव्हरराइडिंग स्विच बदलण्यासाठी रोह्यात हा ब्लॉक घेण्यात येणार असून, पश्चिम रेल्वे, मध्य रेल्वेपाठोपाठ येत्या मंगळवारी कोकण रेल्वेवरही ब्लॉक घेतला जाणार आहे. सदर निर्णयामुळं काही लांब पल्ल्याच्या रेल्वे गाड्यांवर परिणाम होणार आहे. प्राथमिक माहितीनुसार रेल्वे गाड्या 15 ते 20 मिनिटं उशिरानं धावणार असून, यामध्ये खालील रेल्वेगाड्यांचा समावेश आहे.
16345 लोकमान्य टिळक टर्मिनस, तिरुवनंतपुरम नेत्रावती एक्सप्रेस, 16346 तिरुवनंतपुरम - लोकमान्य टिळक टर्मिनस नेत्रावती एक्सप्रेस, 12617 एर्नाकुलम - हजरत निजामुद्दीन एक्सप्रेस, 19577 तिरुनेलवेली - जामनगर एक्सप्रेस या गाड्यांच्या वेळापत्रकात बदल करण्यात आले आहेत. 16346 तिरुवनंतपुरम-लोकमान्य टिळक टर्मिनस नेत्रावती एक्सप्रेस ही रेल्वे रोहा स्थानकावर दोनदा थांबवली जाणार आहे.
कोकण रेल्वेच्या माहितीनुसार रोहा यार्डमधील अप मार्गावरील पॉइंट क्रमांक 126ब आणि 127ए च्या ओव्हरराइडिंग स्विच बदलण्याचं काम केलं जाणार असून, यासाठी मध्य रेल्वेने सकाळी 11.15 ते दुपारी 3.45 पर्यंत ब्लॉक घेणार आहे. हे काम बहुतांशी दुपारपर्यंतच्या कालावधीत करुनही कोकण रेल्वे पूर्वपदावर येण्यासाठी मात्र आणखी काही तास लागण्याची शक्यता आहे. त्यामुळं कोकण रेल्वेनं प्रवास करणार असाल तर हाताशी जास्तीचा वेळ ठेवणं कधीही उत्तम.