Rohit Sharma Century Wife Instagram Story: भारताने इंग्लंडविरुद्ध सुरु असलेल्या मालिकेतील दुसरा सामना रविवारी जिंकला. भारतीय कर्णधार रोहित शर्माला या सामन्यामध्ये सूर गवसल्याने भारताला 300 हून अधिक धावांचं लक्ष्य सहज साध्य करता आलं. या सामन्यामध्ये 37 वर्षीय रोहित शर्माने दमदार शतक झळकावत आपल्यातील क्रिकेट अजून शिल्लक असल्याचं अगदी पुराव्यासहीत दाखवून दिलं. रोहित शर्माने चौकार, षटकारांची आतिषबाजी करत प्रेक्षकांची मनं तर जिंकली शिवाय सामना जिंकून देण्यास मदतही केली. या शतकासहीत रोहितने अनेक विक्रम आपल्या नावावर करुन घेतले. असं असतानाच या सामन्यातील विजयानंतर रोहितची पत्नी ऋतिका सजदेहने इन्स्टाग्रामवर आपल्या पतीच्या दमदार शतकाबद्दल मोजक्या शब्दांमध्ये भावना व्यक्त केल्या आहेत. ऋतिकाची ही इन्स्टाग्राम स्टोरी सध्या चर्चेचा विषय ठरत आहे.
इंग्लंडने सर्व गड्यांच्या मोबदल्यात 304 धावा केल्या. या धावांचा पाठलाग करताना भारतीय सलामीवीर रोहित शर्मा आणि शुभमन गीलने उत्तम सुरुवात केली. दोघांनी 16.4 ओव्हरमध्ये 136 धावांची पार्टनरशीप केली. शुभमन बाद झाल्यानंतरही रोहितची फटकेबाजी सुरुच होती. 96 धावांवर असताना खणखणीत षटकार लगावत आपलं 32 वं शकत झळकावलं. वयाच्या 37 व्या वर्षी रोहितने झळकावलेलं हे शतक त्याचं एकदिवसीय क्रिकेटमधील दुसरं सर्वात वेगवान शतक ठरलं. संघाला विजयासाठी 85 धावा हव्या असताना रोहित 90 बॉलमध्ये 119 धावा करुन बाद झाला. आपल्या खेळीमध्ये रोहितने 12 चौकार आणि 7 षटकार लगावले. रोहितचा स्ट्राइक रेट 132.22 इतका होता. रोहितच्या प्रत्येक फटक्यामध्ये जुना रोहित परतलाय असं दिसत होतं.
ओडिशामधील कटक येथील बाराबती स्टेडियमवर झालेल्या सामन्यात रोहितच्या दमदार खेळीनंतर ऋतिका इन्स्टाग्रामवरुन व्यक्त झाली. भारतीय क्रिकेट संघाच्या अधिकृत इन्स्टाग्राम पेजवरुन शेअर करण्यात आलेल्या रोहित शर्माच्या शतकी सेलिब्रेशनची फोटो पोस्ट ऋतिकाने आपल्या इन्स्टा स्टोरीवरुन शेअर केली. पाणावलेल्या डोळ्यांचे इमोजी वापरत ऋतिकाने, "हे शतक थेट काळजाला भीडणारं आहे," अशी कॅप्शन हार्ट इमोजी वापरत दिली होती.
ऋतिकाच्या या पोस्टचा फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाला असून अनेकांना या पोस्टच्या निमित्ताने पतीच्या कठीण काळात त्याच्या पाठीशी उभी राहणारी ऋतिका आठवली आहे. दरम्यान, रोहितने आपल्या खेळीबद्दल बोलताना आपण खेळायला येतानाच आपली इनिंग कशी असेल याचा टप्प्याटप्प्यात विचार करुन ठेवला होता असं सांगितलं. रोहितने या सामन्यात 7 षटकार लगावत सर्वात षटकार लगावणाऱ्या खेळाडूंच्या यादीत दुसरं स्थान मिळवलं आहे. या विजयाबरोबरच भारताने इंग्लंडविरुद्धच्या मालिकेत 2-0 अशी अभेद्य आघाडी घेतली आहे.