Maharashtra Weather News : देशाच्या उत्तरेकडे पर्वतीय क्षेत्रांमध्ये हवामानात लक्षणीय बदल झाले असून, पुन्हा एकदा किमान तापमानात घट होऊन हिमवर्षाव सुरु झाला आहे. अतीव उत्तरेकडे असणाऱ्या पर्वतांवर बर्फाचं अच्छादन पाहायला मिळत असून पुन्हा एकदा मैदानी भागांच्या दिशेनं शीतलहरींचा प्रवास सुरु झाला आहे.
मध्य भारतात मात्र किमान आणि कमाल तापमानामध्ये वाढ झाली असून, उर्वरित राज्यामध्येही असंच चित्र पाहायला मिळत आहे. महाराष्ट्रात विदर्भ, मराठवाडा आणि कोकण किनारपट्टी क्षेत्रात कमाल तापमानात वाढ झाली असून, पहाटेचा गारवा वगळता दिवसा उष्मा जाणवू लागला आहे. मुंबई शहर आणि उपनगरांमध्येही तापमानाचा कमाल आकडा 36 ते 37 अंशांदरम्यान राहणार असून, राज्यातही वेगळं चित्र नसेल.
फेब्रुवारी महिन्यातच तापमानानं हा आकडा गाठल्यामुळं आता मार्च, एप्रिल आणि मे महिन्यात उन्हाळा आणखी किती तापदायक ठरणार याचीच चिंता नागरिकांना वाटू लागली आहे. राज्यात सध्या निच्चांकी तापमानातही वाढ झाल्यामुळं थंडीनं आता काढता पाय घेतला असं म्हणणं गैर ठरणार नही. हवामान विभागाच्या माहितीनुसार कमाल आणि किमान तापमानाच चढ उतार होत असल्यामुळं उन्हाळा यंदा अपेक्षेहून अधिक मुक्काम करण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.
उत्तराखंडमध्ये केंद्रीय हवामानशास्त्र विभागानं वर्तवलेल्या अंदाजानुसार हवा कोरडी राहणार असून, उत्तराखंडमधील बागेश्वर, पिथौरागढ, रुद्रप्रयाग इथं पावसाची हजेरी असेल असा अंदाज वर्तवण्यात आला आहे. तर, चमोली, देहरादून इथंही पावसाच्या ढगांचं सावट असेल. हिमाचल प्रदेशात जोरदार बर्फवृष्टी जनजीवन विस्कळीत करू शकते असा अंदाज असल्यानं प्रशासन आतापासूनच सतर्क आहे.
देशात उत्तरेकडील राज्य वगळता उर्वरित भागांमध्ये कमाल तापमानात 3 ते 4 अंशांची वाढ होण्यास सुरुवात झाली असून, नागौर, बीकानेर, उदयपुर, बाड़मेर, अलवरसह जोधपूर, जैसलमेर इथंही पारा उष्णतेचे संकेत देताना दिसणार आहे.