मुंबई : कोपर्डी येथे अल्पवयीन मुलीवर बलात्कार करून तिची निर्घृणपणे हत्या केल्याप्रकरणी गेल्या आठवड्यात अहमदनगर जिल्हा सत्र न्यायालयाने जितेंद्र शिंदे, संतोष भवाळ आणि नितीन भैलुमे या तिघांना दोषी ठरवले.
आज याप्रकरणाची सुनावणी होणार असून उद्या २२ तारखेला या दोषींना शिक्षा सुनावण्यात येणार आहे.
अहमदनगरमधील कर्जत तालुक्यातील कोपर्डी गावात १३ जुलै २०१६ रोजी नराधमांनी अल्पवयीन मुलीवर बलात्कार करुन तिची निर्घृण हत्या केली होती. याप्रकरणी जितेंद्र शिंदे, संतोष भवाळ आणि नितीन भैलुमे या तिघांना अटक करण्यात आली होती. या घटनेमुळे राज्यभरात मोठी खळबळ उडाली होती. राज्यभरात काढण्यात आलेल्या मराठा मूक क्रांती मोर्चाच्यावेळी कोपर्डी प्रकरणातील दोषींना फाशी देण्यात यावी, अशी प्रमुख मागणी लावून धरण्यात आली होती.
या खटल्यात सरकारी पक्षाकडून ३१ साक्षीदारांची साक्ष नोंदविण्यात आली आहे. यात मृत मुलीची मैत्रिण, आई, बहिण, चुलत आजी, आजोबा, दंतवैद्यकीय डॉक्टर, दोन तपासी अधिकारी, पंच साक्षीदार असे महत्वाचे साक्षीदार आहेत. तर आरोपी संतोष भवाळच्या वतीने उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार एक बचावाचा साक्षीदार तपासण्यात आला आहे. तसेच न्यायालयात २४ परिस्थितीजन्य पुरावेही सादर करण्यात आले. अंतिम युक्तिवादाचे ऑडिओ रेकॉर्डिंगही करण्यात आले आहे.
१३ जुलै २०१६
कोपर्डीत राहणारी १५ वर्षांची मुलगी नववीत शिकत होती. पीडित मुलीवर नराधमांनी १३ जुलै २०१६ रोजी संध्याकाळी अत्याचार केला. पीडित मुलगी आजोबांच्या घरी जात असताना नराधमांनी दुचाकीवरुन तिचा पाठलाग केला आणि गावातील निर्जनस्थळी नेऊन तिच्यावर बलात्कार करुन तिची हत्या केली.
१५ जुलै २०१६
कोपर्डी प्रकरणात पहिली अटक, जितेंद्र शिंदेला श्रीगोंद्यातून अटक
१६ जुलै २०१६
आरोपी संतोष गोरख भवाळ (३०) याला अटक
१७ जुलै २०१६
तिसरा आरोपी नितीन गोपीनाथ भैलुमे (२६) याला अटक.
१८ जुलै २०१६
कोपर्डी प्रकरणाचे पडसाद राज्यभरात उमटू लागले. आरोपींना कठोर शिक्षा व्हावी, या मागणीसाठी राज्यभरात मोर्चे निघत होते. विधिमंडळाच्या अधिवेशनातही हा मुद्दा उपस्थित होण्याची शक्यता असल्याने पोलिसांच्या स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेकडे या प्रकरणाचा तपास वर्ग करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला.
७ ऑक्टोबर २०१६
कोपर्डीतील तिन्ही आरोपींविरोधात दोषारोपपत्र दाखल. घटनेच्या ८६ दिवसांनी आरोपपत्र दाखल करण्यात आले. घटनेनंतर एक महिन्यात दोषारोपपत्र दाखल करु, असे पोलिसांनी सुरुवातीला सांगितले होते.
२० ऑक्टोबर २०१६
खटल्याच्या सुनावणीला सुरुवात
१ एप्रिल २०१७
शिवबा संघटनेच्या चार कार्यकर्त्यांनी न्यायालयाच्या आवारात आरोपींवर हल्ल्याचा प्रयत्न केला.
२ जुलै २०१७ –
कोपर्डीत सूर्योदय संस्थेच्यावतीने निर्भयाचं स्मारक बांधण्याच निर्णय
९ ऑक्टोबर २०१७
खटल्याची सुनावणी पूर्ण
१८ नोव्हेंबर २०१७
तिन्ही नराधमांना न्यायालयाने दोषी ठरवले