मुंबई : Latest News on Monsoon : गेल्या 12 वर्षात आयएमडीने वर्तवलेला मान्सूनचा अंदाज केवळ दोन वेळा तंतोतंत आला आहे. यावर्षी सामान्य मान्सूनचा अंदाज वर्तवला आहे. सरासरी 99 टक्के पाऊस होण्याची शक्यता आयएमडीने वर्तवली आहे.
मात्र 2011 आणि 2017 या दोन वर्षीच मान्सूनचा अंदाज तंतोतंत आला आहे. दीर्घकालीन अंदाज एप्रिलमध्ये वर्तवला जातो. दीर्घकालीन अंदाज वर्तवण्यात सुधारणा होत असल्याचं दिसून येत आहे.
दरम्यान, राज्यात पुढील 4 दिवस पावसाचा इशारा देण्यात आला आहे. वादळ आणि सोसाट्याचा वारा सुटण्याची शक्यता आहे. राज्याला उष्णतेचा तडाखा बसत असताना राज्यात बहुतांश भागात 23 एप्रिलपर्यंत पावस पडेल.
कोकण, गोवा, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा, विदर्भात पाऊस, वादळ होईल. विदर्भात काही ठिकाणी तापमानात सरासरीच्या तुलनेत वाढ झालीय. तर कोकण, गोवा, मध्य महाराष्ट्रात तापमानात वाढ झाली आहे. त्यातच आता पाऊस पडणार असल्याने उष्णतेने तापलेल्या नागरिकांना काहीसा दिलासा मिळेल.
भारतीय हवामान विभागाने अंदाज वर्तवला आहे की आजपासून वायव्य, मध्य आणि पूर्व भारतातील काही भागांमध्ये उष्णतेची लाट कमी होण्याची शक्यता आहे कारण बंगालच्या उपसागरातून येणारे जोरदार नैऋत्य वारे आणि पश्चिम विक्षोभ यामुळे वादळी वारे आणि गडगडाटासह पावसाची शक्यता आहे. पुढील चार दिवस पाऊस पडेल, असा अंदाज आहे.
भारतीय हवामान विभाग (IMD) ने म्हटले आहे की, आजपासून पश्चिम हिमालयीन प्रदेश आणि लगतच्या मैदानी भागात विजांच्या कडकडाटासह आणि सोसाट्याच्या वाऱ्यासह वादळ मध्य आणि पूर्व भारताकडे विस्तारण्याची शक्यता आहे. पुढील चार दिवसांत अरुणाचल प्रदेश, आसाम, मेघालय, नागालँड, मणिपूर, मिझोराम, त्रिपुरा, सिक्कीम आणि उप-हिमालयीन पश्चिम बंगालमध्ये जोरदार पावसाचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे. आसाम आणि मेघालयात 23 एप्रिलपर्यंत गडगडाट, विजांचा कडकडाट आणि सोसाट्याच्या वाऱ्यासह मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे.