मुंबई : उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सादर केलेल्या अर्थसंकल्पावरील चर्चेत बोलताना माजी अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी राज्यसरकारवर बोचरी टीका केली. तर, सावध रहा असं आवाहन जनतेला केलंय.
राज्याच्या अर्थसंकल्पात जुन्याच घोषणा केल्या आहेत. वारंवार त्याचा उलेलख बजेटमध्ये दिसून येतो. मागील बजेट काळात ज्या योजनांची घोषणा केली त्याबद्दल काहीच केले नाही. आणि आता या नव्या फसव्या घोषणा केल्या आहेत.
विधानभवन येथे चहा, स्टाॅल ऐवजी वाॅईन विक्री स्टाॅल काढण्याची वेळ येणार आहे का? किराना मोफत द्या पण वाईन विक्री नको. राज्यात मध्यान्न भोजन योजना ऐवजी मद्यान्न पेय योजना आणणार का? असा सवाल करत लखनऊच्या भुलभुलैय्या पेक्षाही फसवणूक करणारा हा अर्थसंकल्प असल्याची टीका त्यांनी केली.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी बेस्टला डिजीटल स्वरुपात आणले. सगळीकडे फ्लेक्स लागले. पण, सीएमही डिजिटल झाले आहेत. सीएम आहेत कोठे? त्यांचेही आता फ्लेक्स लावावे लागतील. ते ऍक्टिव्ह कधी होणार, सामान्य जनतेला त्याचे दर्शन कधी होणार? नागपूरला अधिवेशन न घेता विदर्भवर अन्याय का केला अशी टोलेबाजी त्यांनी मुख्यमंत्र्यावर केली.
पेट्रोल, डिझेल दर वाढले म्हणून नाना पटोले हे सायकलवरून राजभवनावर गेले. मग, राज्य शासनाची काही जबाबदारी नाही का? नाना पटोले यांना आयुष्यभर सायकलवर फिरवणार का असा खोचक टोला लगावला.
राज्यात महाविकास आघाडी सरकार स्थापन झाले. मात्र, सर्वाधिक आमदार असूनही सत्ता स्थापन करता आली नाही याचे भाजप नेत्यांच्या मनातील शल्य पुन्हा उफाळून येत असते. म्हणून मग मुनगंटीवार यांनी आपला मोर्चा एकनाथ शिंदे यांच्याकडे वळविला.
एकनाथ शिंदे तुमची मुख्यमंत्री होण्याची इच्छा आहे. पण काही काळजी करू नका. तुम्ही फक्त २५ आमदारांची यादी द्या. सरकार कसे तयार करायचे हे मी तुम्हाला सांगतो. आमची प्रशिक्षण देण्याची तयारी आहे असे सांगितले.