24 Nov 2024, 11:50 वाजता
पुणे-मुंबई एक्सप्रेस वेवर गॅस टँकर पलटला; वाहतूक ठप्प
पुणे-मुंबई एक्सप्रेस वेवर गॅस वाहतूक करणारा टँकर पलटी झाला आहे. मुंबईकडे जाणारी वाहतूक ठप्प. वारजे पुलाजवळ गॅस टँकर हायवेवर पलटी. मुंबईकडून पुण्याच्या दिशेने जाणारी वाहतूक खोळंबली. टँकर बाजूला करण्यासाठी प्रशासनाचे कर्मचारी घटनास्थळी दाखल झालेत.
24 Nov 2024, 11:32 वाजता
प्रणिती शिंदे यांच्या बालेकिल्ल्यात भाजपचा विजय
सोलापूर शहर मध्य मतदार संघाची विधानसभा निवडणूक ही अत्यंत चुरशीची होईल असा अनेक राजकीय विश्लेषकांनी देखील अंदाज व्यक्त केला होता. शहर मध्य मतदारसंघ हा खासदार प्रणिती शिंदे यांचा बालेकिल्ला म्हणून ओळख आहे. प्रणिती शिंदे या तीन वेळा या ठिकाणी आमदार म्हणून निवडून आलेले आहेत. मात्र आता हा गड भाजपाने काबीज केला आहे. कालचा प्रत्यक्ष निकाल पाहता ही निवडणूक एकतर्फी झाली असून एमआयएमचे उमेदवार फारूक शाब्दि यांचा 48 हजार 850 मतांनी पराभव करत भाजपचे देवेंद्र कोठे यांनी दणदणीत विजय मिळवला आहे.
24 Nov 2024, 11:32 वाजता
कोल्हापुरातील महायुतीच्या आमदारांना घेऊन विशेष विमान मुंबईकडे रवाना
कोल्हापुरातील विधानसभा निवडणुकीत महायुतीने घवघवीत यश मिळवत माहितीचे दहा आमदार विजयी झालेत. या आमदारांना घेऊन कोल्हापुरातून खासदार धनंजय महाडिक विशेष विमानाने मुंबईकडे रवाना झालेत. कोल्हापुरातील राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष राजेश क्षीरसागर यांच्यासह राजेंद्र पाटील-यड्रावकर, राहुल आवाडे,अमल महाडिक, प्रकाश आबिटकर , शिवाजी पाटील, चंद्रदीप नरके यांच्यासह अन्य महायुतीच्या आमदारांचा समावेश आहे.
24 Nov 2024, 11:23 वाजता
राज्य निवडणूक आयोगाचे अधिकारी आज संध्याकाळी राज्यपाल सी.पी. राधाकृष्णन यांची भेट घेणार. निवडणूक आयोगाची प्रक्रिया पूर्ण झाल्याची माहिती राज्यपालांना आयोगाकडून कळवली जाणार. सोबतच, निवडून आलेल्या आमदारांची यादी राज्यपालांना सादर केली जाणार . त्यानंतर राज्यपालांकडून १५ वी विधानसभा अस्तित्वात आल्याचं नोटिफिकेशन काढत सरकार स्थापनेची प्रक्रिया सुरु करणार
24 Nov 2024, 10:41 वाजता
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका लवकरच होणार?
ओबीसी बाबत कोर्टाचा निर्णय झाल्यावर निवडणुका घेतल्या जाणार. सूत्रांच्या माहितीनुसार विधानसभा निवडणुकीत मिळालेल्या घवघवीत यशानंतर महायुती राज्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका घेण्यात येणार आहेत. त्यामुळे राज्यात लवकरच राज्यात लवकरच स्थानिक स्वराज संस्थांच्या निवडणुकीचे बिगूल वाजण्याची शक्यता आहे.विधानसभेच्या एतिहासिक यशानंतर महायुतीच्या नेत्यांमध्ये याबाबत सकारात्मक भूमिका आहे.
24 Nov 2024, 09:53 वाजता
'फडणवीस भावी मुख्यमंत्री'; पुण्यात जागोजागी झळकले बॅनर्स
पुण्यात देवेंद्र फडणवीस यांचे भावी मुख्यमंत्री म्हणून बॅनर झळकले आहेत. पुण्यातील कोथरूड विधानसभा मतदारसंघात लागले देवेंद्र फडणवीस यांचे भावी मुख्यमंत्री म्हणून उल्लेख असलेले बॅनर्स. महायुतीच्या राज्यातील विजयानंतर पुण्यात फडणवीस यांचा मुख्यमंत्री असा उल्लेख असणारे बॅनर झळकले आहेत. पुण्यातील आजी-माजी नगरसेवकांकडून फडणवीसांची बॅनरबाजी करण्यात आली आहे. पुण्यातील बाणेर बालेवाडी परिसरात लावण्यात आले बॅनर्स.
24 Nov 2024, 09:02 वाजता
महाराष्ट्रातील NOTA चं प्रमाण किती? निवडणूक आयोगाने सांगितली आकडेवारी
निवडणूक आयोगाच्या आकडेवारीनुसार, महाराष्ट्रात विधानसभा 288 जागांसाठी एका टक्क्यापेक्षा (0.75 टक्के) कमी मतदारांनी नोटा (नन ऑफ दि अबाव्हू) या पर्यायाचा वापर केला. आम्हाला कोणत्याही उमेदवाराला मत द्यायचे नाही असे मतदाराला दर्शवायचे असेल तर तो ईव्हीएमवरील नोटाचे बटन दाबतो. झारखंडमध्ये 1.31 टक्के मतदारांनी नोटाची निवड केली.
24 Nov 2024, 08:59 वाजता
विजयी मिरवणुकीमध्येच भाजपामधील अंतर्गत वाद चव्हाट्यावर
"पंकजाताई, तुम्ही माझ्या बाबतीत असं वागायला नको होतं. "भाजपचा उमेदवार असूनही पंकजा मुंडेंनी माझ्या पराभवसाठी प्रयत्न केले," अशी विधानं भाजपाचे आमदार सुरेश धस यांनी केली आहेत. विजयी मिरवणुकीतच भाजप आमदार सुरेश धस यांचे पंकजा मुंडेंवर आरोप केले आहेत. या माध्यमातून बीड भाजपमधील अंतर्गत वाद विकोपाला पोहोचला आहे.
24 Nov 2024, 08:58 वाजता
महाराष्ट्राला मिळाला सर्वात कमी वयाचा आमदार
महाराष्ट्राला यंदाच्या विधानसभेमध्ये सर्वात कमी वयाचा आमदार मिळाला आहे. सविस्तर तपशील जाणून घेण्यासाठी येथे क्लिक करा
24 Nov 2024, 08:54 वाजता
अजित पवारांची काकांना धोबीपछाड! विधानसभेला शरद पवारांपेक्षा पॉवरफूल
राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फूट पडल्यानंतर शरद पवार विरुद्ध अजित पवार या लढाईत लोकसभा निवडणुकीत अजित पवारांना फटका बसला होता, मात्र विधानसभा निवडणुकीत अजित पवार पॉवरफूल ठरले असून शरद पवारांचा करिष्मा या निवडणुकीत चालला नाही. बारामती विधानसभा मतदारसंघाच्या निकालाकडे सगळ्यांचे लक्ष होते, इथून अजित पवार मोठ्या मतांच्या आघाडीने विजयी झाले आहेत. विधानसभेच्या 36 मतदारसंघात शरद पवार गट विरुद्ध अजित पवार गट असा थेट मुकाबला होता. त्यातील केवळ 5 मतदारसंघात शरद पवारांचे उमेदवार विजयी झाले आहेत. तर 29 मतदारसंघात अजित पवारांच्या उमेदवारांनी बाजी मारली आहे. तर दोन मतदारसंघात अपक्ष उमेदवार निवडून आले आहेत.