24 Nov 2024, 08:54 वाजता
राणेंच्या घरात एक खासदार, दोन आमदार
माजी केंद्रीय मंत्री खासदार नारायण राणे यांचे पुत्र नितेश राणे काणवकवलीतून, तर त्यांचे सख्खे भाऊ नीलेश राणे (शिंदेसेना) कुडाळमधून जिंकले, आता राणेंच्या घरात ते स्वतः खासदार आणि दोन मुले आमदार अशी सत्ता आली आहे.
24 Nov 2024, 08:52 वाजता
पालघर, रायगड, मावळमध्ये शिंदे-भाजपाचा जोर
पालघर रायगड मावळमधील 13 जागांपैकी एकही जागा काँग्रेस, उद्धव ठाकरे आणि शरद पवारांची राष्ट्रवादी यांना जिंकता आली नाही. याउलट भाजपने पालघर मध्ये 3, रायगडमध्ये 1 आणि मावळमध्ये 2 अशा 6 जागा जिंकल्या. शिंदे यांच्या शिवसेनेने देखील पालघर 2, रायगड 2 आणि मावळ 1 अशा जागा जिंकल्या.
24 Nov 2024, 08:51 वाजता
शिंदेंच्या ठाण्यात भाजपाचा स्ट्राइक रेट 100 टक्के
एकनाथ शिंदे यांनी मुंबईत 14 जागी उमेदवार उभे केले होते. त्यातील 4 उमेदवार विजयी झाले. याउलट ठाण्यात घडले. ठाण्यात विधानसभेच्या 18 जागा आहेत. तेथे ठाकरे यांनी १० उमेदवार उभे केले होते. ते सर्वच्या सर्व पराभूत झाले. याउलट भाजपने ठाण्यात 100 टक्के यश मिळवत उभे केलेले सर्व 9 उमेदवार विजयी केले. एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेने 7 उमेदवार ठाण्यात उभे केले. त्यातील 6 विजयी झाले. शरद पवार आणि अजित पवार यांच्या राष्ट्रवादीसह समाजवादी पक्षाला प्रत्येकी एका जागेवर यश मिळाले.
24 Nov 2024, 08:51 वाजता
मनसेमुळे भाजपाचा मार्ग झाला मोकळा
ठाणे आणि मुंबई दोन्ही ठिकाणी मिळून मनसेने 41 उमेदवार उभे केले होते. त्यापैकी एकही उमेदवार विजयी झाला नाही. मात्र, मनसेने मिळविलेल्या मतांमुळे भाजपच्या यशाचा मार्ग मोकळा झाला आहे.
24 Nov 2024, 08:45 वाजता
अजित पवारांची राष्ट्रवादी आज घेणार मोठा निर्णय
आज सकाळी 11 वाजता राष्ट्रवादी अजित पवार गटाच्या विधीमंडळ नेत्यांची बैठक पार पडणार आहे. या बैठकीत नेता निवडला जाणार आहे. अजित पवारांचं शासकीय निवासस्थान असलेल्या 'देवगिरी' बंगल्यावर ही बैठक पार पडणार आहे. पक्षातील विजयी उमेदवारांनी आपले प्रमाणपत्र घेऊन येण्याचे निर्देश पक्षाकडून देण्यात आले आहेत.
24 Nov 2024, 08:45 वाजता
मुंबईत ठाकरेंचा स्ट्राइक रेट 50 टक्क्यांवर
मुंबई कुणाची... शिवसेनेची... अशा घोषणा मुंबईत सतत ऐकायला मिळतात. या विधानसभा निवडणुकीच्या निकालाने मुंबई भाजपची आणि उद्धव ठाकरे यांची, तर ठाणे मात्र एकनाथ शिंदेंचे यावर शिक्कामोर्तब केले आहे. या सगळ्या गदारोळात काँग्रेस पक्षाने मात्र स्वतःची अवस्था अत्यंत दारुण करून घेतली आहे. काँग्रेसच्या या अवस्थेला काँग्रेसच जबाबदार आहे. मुंबईत 36 जागा आहेत, भाजपने 19 जागी उमेदवार उभे केले होते, त्यातले 16 उमेदवार विजयी झाले. उद्धव ठाकरे यांनी 22 जागा लढवल्या, त्यातील 11 जागांवर उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेला यश आले.
24 Nov 2024, 08:41 वाजता
सरकार स्थापन करण्यासाठी कराव्या लागणार 'या' 5 गोष्टी
> भाजपाकडून आता केंद्रीय निरीक्षक नेमणूक होईल.
> केंद्रीय निरीक्षक नेमणूक झाल्यावर भाजपा पक्षाची अंतर्गत बैठक होईल.
> या बैठकीत भाजपा गटनेता निवडला जाईल.
> गटनेता निवडीनंतर भाजपा गटनेते हे राज्यपालांकडे सत्ता स्थापन दावा करण्यासाठी जातील.
> राज्यपाल वेळ देतील आणि नव्या मुख्यमंत्र्यांचा शपथविधी पार पडेल.
24 Nov 2024, 08:41 वाजता
विधानसभा पोटनिवडणुकीतही भाजपची सरशी
14 राज्यांतील 48 विधानसभा जागांसाठी झालेल्या पोटनिवडणुकीत सर्वाधिक 20 जागा जिंकत भाजपने आघाडी मिळवली असून उत्तर प्रदेशात समाजवादी पार्टीला मात देत राजस्थानातही आपले वर्चस्व सिद्ध केले. काँग्रेसने 7 जागा मिळवल्या आहेत. उत्तर प्रदेशातील 9, राजस्थान-7, पश्चिम बंगाल- 6, आसाम-4, पंजाब-4, बिहार-4, कर्नाटक-3, केरळ-3, मध्य प्रदेश-2 तर छत्तीसगड, गुजरात, उत्तराखंड आणि मेघालयातील प्रत्येकी एका जागेसाठी ही मतमोजणी झाली. उत्तर प्रदेशात भाजपप्रणित राष्ट्रीय लोकशाही आघाडीने 7 जागा जिंकल्या आहेत. राजस्थानात 7 पैकी 5 जागा जिंकून राज्यात आपली शक्ती सिद्ध केली.
24 Nov 2024, 08:37 वाजता
मुंबईमध्ये 'या' मतदारसंघात सर्वाधिक NOTA मतं
विधानसभा निवडणुकीत मुंबईतील 36 विधानसभा मतदारसंघांत 70 हजारांहून अधिक मतदारांनी हक्क बजावताना 'नोटा' मतांना पसंती दिली. यामध्ये सर्वाधिक नोटा मते अणुशक्तीनगरमध्ये असून त्याची संख्या 3884 आहेत तर सगळ्यात कमी नोटा मते मानखुर्द शिवाजी नगरमध्ये असून त्यांची संख्या फक्त 130 आहे. उमेदवाराबाबत नाराजी आणि नापसंती दर्शवण्यासाठी मुंबईकरांनी 'नोटा' पर्याय स्वीकारलेला दिसून आले.
24 Nov 2024, 08:37 वाजता
पुण्यात विजयी जल्लोष; अनुचित घटना नाहीत! पोलिसांचा कडक बंदोबस्त
विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर शहरात ठिकठिकाणी जल्लोष करण्यात आला. पोलिसांनी शहर, तसेच उपनगरात कडक बंदोबस्त ठेवला होता. शहरात कोठेही अनुचित घटना घडली नाही. विधानसभा निवडणुकीचा निकाल जाहीर झाल्यानंतर शहर, तसेच उपनगरात दुपारनंतर जल्लोष करण्यात आला. जल्लोषानंतर कार्यकर्त्यांमध्ये होणारे वादावादीच्या घटना रोखण्यासाठी पोलिसांनी बंदोबस्ताची आखणी केली होती. पोलीस आयुक्त अमितेश कुमार, सहपोलीस आयुक्त रंजनकुमार शर्मा यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ अधिकारी, अडीच हजार पोलीस कर्मचारी, राज्य राखीव पोलीस दल, तसेच केंद्रीय सशस्त्र पोलीस दलाच्या तुकड्या बंदोबस्तास तैनात करण्यात आल्या होत्या. दुपारी बाराच्या सुमारास निकालाचा कल स्पष्ट झाल्यानंतर भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्यांनी जल्लोष केला. श्री जोगेश्वरी मंदिर, लाल महाल चौक, मंडई, शनिपार चौकात कार्यकर्त्यांनी जल्लोष केला. चैाकचौकात आतषबाजी करण्यात आली, तसेच गुलाल उघळण्यात आला.