24 Nov 2024, 08:37 वाजता
मुंबईमध्ये 'या' मतदारसंघात सर्वाधिक NOTA मतं
विधानसभा निवडणुकीत मुंबईतील 36 विधानसभा मतदारसंघांत 70 हजारांहून अधिक मतदारांनी हक्क बजावताना 'नोटा' मतांना पसंती दिली. यामध्ये सर्वाधिक नोटा मते अणुशक्तीनगरमध्ये असून त्याची संख्या 3884 आहेत तर सगळ्यात कमी नोटा मते मानखुर्द शिवाजी नगरमध्ये असून त्यांची संख्या फक्त 130 आहे. उमेदवाराबाबत नाराजी आणि नापसंती दर्शवण्यासाठी मुंबईकरांनी 'नोटा' पर्याय स्वीकारलेला दिसून आले.
24 Nov 2024, 08:37 वाजता
पुण्यात विजयी जल्लोष; अनुचित घटना नाहीत! पोलिसांचा कडक बंदोबस्त
विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर शहरात ठिकठिकाणी जल्लोष करण्यात आला. पोलिसांनी शहर, तसेच उपनगरात कडक बंदोबस्त ठेवला होता. शहरात कोठेही अनुचित घटना घडली नाही. विधानसभा निवडणुकीचा निकाल जाहीर झाल्यानंतर शहर, तसेच उपनगरात दुपारनंतर जल्लोष करण्यात आला. जल्लोषानंतर कार्यकर्त्यांमध्ये होणारे वादावादीच्या घटना रोखण्यासाठी पोलिसांनी बंदोबस्ताची आखणी केली होती. पोलीस आयुक्त अमितेश कुमार, सहपोलीस आयुक्त रंजनकुमार शर्मा यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ अधिकारी, अडीच हजार पोलीस कर्मचारी, राज्य राखीव पोलीस दल, तसेच केंद्रीय सशस्त्र पोलीस दलाच्या तुकड्या बंदोबस्तास तैनात करण्यात आल्या होत्या. दुपारी बाराच्या सुमारास निकालाचा कल स्पष्ट झाल्यानंतर भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्यांनी जल्लोष केला. श्री जोगेश्वरी मंदिर, लाल महाल चौक, मंडई, शनिपार चौकात कार्यकर्त्यांनी जल्लोष केला. चैाकचौकात आतषबाजी करण्यात आली, तसेच गुलाल उघळण्यात आला.
24 Nov 2024, 08:33 वाजता
महायुती सरकारचा शपथविधी शिवाजी पार्कवर?
नव्या सरकारच्या शपथविधीसाठी महायुतीचा शिवाजी पार्कसाठी आग्रह असल्याची माहिती समोर येत आहे. निकालाच्या दिवशी 2014 प्रमाणे शपथविधी वानखेडे स्टेडियमवर होईल अशी शक्यता व्यक्त केली जात होती. मात्र आता हा शपथविधी शिवसेना भवनापासून हाकेच्या अंतरावर असलेल्या शिवाजी पार्कवर घेण्याचा आग्रह असल्याची माहिती समोर येत आहे. विश्वसनीय सूत्रांनी ही माहिती दिली आहे.
24 Nov 2024, 08:33 वाजता
महायुती सरकारचा शपथविधी उद्याच? मात्र, राज्यपालांकडून...
महायुती सरकारचा शपथविधी उद्या म्हणजेच 25 तारखेला पार पडणार असल्याची माहिती समोर येत आहे. विश्वसनीय सूत्रांनी ही माहिती दिली आहे. मात्र, राज्यपालांकडून अद्याप कुठल्याही पक्षाला सरकार स्थापनेचे निमंत्रण नसल्याचीही माहिती समोर येत आहे.